जामखेड: १२,७५० मतदारांचे भवितव्य टांगणीला;BLO च्या संथ कामाचा बसणार फटका? उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा कडक कारवाईचा इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात SIR प्रक्रियेत जुळणी न झालेले व तार्किक विसंगती असलेल्या मतदारांची पडताळणी मोहीम वेगात सुरू असताना, जामखेड तालुक्यातून मात्र धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बीएलओंच्या (BLO) उदासीनतेमुळे जामखेड तालुक्यात अवघे २० टक्के काम पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील १२ हजार ७५० मतदारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Jamkhed, Fate of 12,750 voters hangs in balance, will BLO's sluggish work take  toll?, Deputy District Election Officer warns of strict action,

जामखेड तालुक्यात SIR प्रक्रियेचे अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी जामखेडमध्ये येत बीएलओंच्या कामकाजाची चांगलीच झाडाझडती घेतली. “वारंवार सूचना देऊनही जे कर्मचारी कामात सुधारणा करत नाहीत, त्यांच्यावर आता थेट प्रशासकीय कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

१२,७५० मतदारांपैकी १०,२१३ जणांची पडताळणी प्रलंबित

जामखेड तहसील कार्यालयात बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत समोर आलेली तालुक्याची आकडेवारी सर्वांचीच उडवणारी आहे. जामखेड तालुक्यात जुळणी न झालेले ३,७८२ मतदार आहेत. तर तार्किक विसंगती असलेले ८,९६८ मतदार आहेत. एकण १२,७५० मतदारांची पडताळणी BLO मार्फत होणे अपेक्षित आहे. मात्र जामखेड तालुक्यातील BLO च्या उदासीनतेमुळे १२,७५० मतदारांपैकी २,५३७ मतदारांची कार्यवाही पुर्ण झाली असून १०,२१३ मतदारांची कार्यवाही अपुर्ण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पाच ठिकाणी शून्य टक्के काम

एकीकडे निवडणूक आयोगाचे कडक नियम लागू असताना, जामखेडमध्ये तब्बल १० हजारांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी व पडताळणी बीएलओंच्या निष्काळजीपणामुळे रखडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे जांबवाडी, जामखेड यादी भाग क्रमांक १०४,जामखेड यादी भाग क्रमांक १०५, धामणगाव, माहारुळी या पाच ठिकाणी शुन्य टक्के काम झाले आहे. वारंवार ताकीद देऊनही संबंधित बीएलओ यांच्या वर्तनात व कामात कोणतीही प्रगती दिसून आली नाही. यावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

त्यांनी बैठकीतूनच संबंधित बीएलओंना थेट फोन लावून तात्काळ काम सुरू करण्याचे सक्त आदेश दिले. तसेच या कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांचा लेखी खुलासा घेण्याचे निर्देश सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले. जे BLO वेळेत काम पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी गाढे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात काय स्थिती?

जिल्हाभरातील मोहिमेचा आढावा देताना सुनील गाढे यांनी सांगितले की, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात जुळणी न झालेले व तार्किक विसंगती असलेले एकूण २ लाख ९२ हजार ४५२ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४७ हजार ६९२ मतदारांसंदर्भातील पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतदारांची आवश्यक कागदपत्रे गोळा करून त्रुटी दूर करण्याचे काम जिल्ह्यातील सुमारे ३८२ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या तुलनेत जामखेड तालुक्यातील संथ गती अत्यंत चिंताजनक आहे.

२६ ऑक्टोबरपर्यंत मुदत; नवोदित मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी, नाव वगळणी, दुरुस्ती तसेच दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत नवोदित मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांवर विहित मुदतीत आणि निवडणूक नियमावलीनुसार योग्य निर्णय घेऊन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

जामखेड तहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांच्यासह प्रभारी तहसीलदार शीतलकुमार सावळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवडणूक नायब तहसीलदार विशाल सदनापूर, प्रदीप पांडुळे, प्रियांश सरोदे, संगणक चालक अभिजित रायकवाड यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.