जामखेड : सराईत चोराचा खाकीवर हल्ला, पलंग दर्शनावेळी भयंकर राडा, पोलिस कर्मचारी जखमी!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात खळबळ उडवून देणारी एक मोठी घटना घडली आहे. चोरट्याने चक्क पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. या घटनेने जामखेडच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे वेशीवर टांगले गेले आहेत.

Jamkhed, Habitual thief attacks police, violent commotion erupts during palang darshan, police personnel injured,

जामखेड शहरात तुळजाभवानी मातेच्या पलंग दर्शनासाठी उसळलेल्या अलोट गर्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन खिसे कापणाऱ्या सराईत चोरट्याला रंगेहात पकडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवरच चोरट्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या नवीन इमारतीजवळ पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी गर्दीत एक सराईत चोरटा नागरिकांचे खिसे कापत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घोळवे यांनी तत्परतेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चोरट्याने घोळवे यांच्याच हातातील काठी हिसकावून घेत त्यांच्या डोक्यावर सडकून प्रहार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपील बेड्या ठोकल्या. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. खाकीवर थेट हल्ला झाल्याने जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जामखेड शहरात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.