अचानक पोलिस आले आणि नागरिकांच्या  काळजाचा ठोका चुकला, जामखेडच्या खर्डा चौकात नेमकं काय घडलं ? Jamkhed Police Mock Dril

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख।  वार शनिवार.. वेळ सायंकाळी सातची.. अचानक जामखेड पोलिसांचा फोन खणाणतो.. शहरातील खर्डा चौकात दोन गटात मोठा वाद झाल्याची वर्दी ठाणे अंमलदारास मिळते… त्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड मोठ्या फौजफाट्यासह खर्डा चौकात दाखल होतात.. शस्त्रधारी पोलिस.. सायरन वाजवत आलेली रुग्णवाहिका.. पाठोपाठ… अग्निशमन गाडी.. खर्डा चौकात दाखल होते.. शहरात काही तरी मोठी गडबड झाल्याची चाहूल एव्हाना नागरिकांना लागते..

Suddenly the police came and the citizens' concern was lost, what exactly happened in Jamkhed's Kharda Chowk, Jamkhed Police Mock Drill

त्यातच एक जमाव घोषणाबाजी करत पुढे येतो. तोच पोलिसांचे एक पथक त्यावर चाल करून जाते.. त्यातच.. काही कळायच्या आत गोळीबार होतो.. आणि चौकात जमलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो.. मात्र  अगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही संभाव्य प्रसंगाला सज्ज असल्याचे दाखवून देण्यासाठी जामखेड पोलिसांनी केलेले हे माॅक ड्रील ( jamkhed police mock dril) असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा आणि इतर यंत्रणा किती सतर्क आहे याची चाचपणी करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिसांकडून जामखेड शहरातील खर्डा चौक ( डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक) परिसरात शनिवार दि 27 रोजी माॅक ड्रील घेण्यात आले.

घटना घडल्यास पोलिस अधिकारी आणि इतर शासकीय यंत्रणा किती वेळात घटनास्थळी दाखल होतात. इतर विभागांना घटनास्थळी येण्यास किती वेळ लागतो, अनुचित घटना घडल्यास त्यास कसा प्रतिबंध करता येईल, जमाव कसा पांगवता येईल, बेकाबू जमावावर कसे नियंत्रण मिळवता येईल याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.

यावेळी खर्डा चौकात तरूणांचा एक गट हमारी मांगे पुरी करो अश्या घोषणा देत पोलिसांच्या समोर आला होता. पोलिस आणि जमाव आमने सामने होते. अनियंत्रित जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांच्या एका गटाने लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

परंतू जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून हवेत फायर करण्यात आला. यात एक तरूण जखमी झाला.. त्याला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने उचलले आणि रुग्णवाहिकेत टाकले.. सायरन वाजवत रुग्णवाहिका सुसाट रुग्णालयाच्या दिशेनं गेली.. हे दृश्य बघताना नागरिकांना काही वेळ काहीच सुचत नव्हते.. काही जण तर पार गोंधळून गेले होते.

प्रत्यक्षात सदरचा प्रकार हा दंगा काबू करण्यासाठीची जामखेड पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेली रंगीत तालीम असल्याचे समजताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या माॅक ड्रीलमध्ये जामखेड नगर परिषदेची अग्निशमन गाडी, आरोग्य विभागाची रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली होती.

सदर प्रात्यक्षिक करते वेळी उद्भवलेल्या प्रसंगाला तात्काळ सामोरे जाणेसाठी  2 पोलीस अधिकारी व 25 पोलीस अंमलदार व 6 होमगार्ड तात्काळ उपलब्ध झाले होते. खर्डा चौकात मॉब डिस्पोझलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.जमाव विसर्जनाचे प्रात्यक्षिक पोहेकॉ.रमेश फुलमाळी  यांनी पध्दतशीरपणे करून दाखवले.यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात ,जामखेड पोलीस स्टेशनचे 25 पोलीस अंमलदार व 6 होमगार्ड उपस्थित होते.

एखादी घटना घडल्यास पोलीसांचा तत्काळ प्रतिसाद मिळवण्यासाठी तसेच येणा-या अडचणी जाणुन घेण्यासाठी दंगा काबु योजना व मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मॉब डिस्पोजल प्रात्यक्षिक करतेवेळी 1 डमी राऊंड फायर करण्यात आला आहे.तसेच सौम्य लाठीमार करण्याचा सराव करण्यात आला. या प्रात्यक्षिकाला सर्वांचा तत्काळ चांगला प्रतिसाद मिळाला तसेच इतर विभागाचे अधिकारी यांचीही लवकरात लवकर मदत मिळाली.– संभाजीराव गायकवाड, पोलिस निरीक्षक, जामखेड