जामखेडमध्ये 30 वर्षीय तरूणाचा खून ! जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 24 ऑक्टोबर 2022। एकिकडे दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचलेला असतानाच ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी या उत्साहाला गालबोट लागण्याची घटना घडली. जामखेड शहराजवळील धोत्री शिवारात एका 30 वर्षीय तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Murder of 30-year-old youth in Jamkhed, murder case registered against unknown accused in Jamkhed police station,

जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर आज 24 रोजी एका 30 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर मयत तरुणाच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, डोक्यावर, हातावर व पायावर काहीतरी टनक हत्याराने जबर मारहाण करुन जिवे ठार मारले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

खून झालेल्या तरूणाविषयी माहिती घेतली असता सदर तरूण बीडच्या गेवराई तालुक्यातील संगमजळगाव या गावातील असल्याची माहिती समोर आली. गणेश शिवाजी वारे वय-30 वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मयताचे वडिल शिवाजी मारुती वारे वय-52 वर्ष यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 302 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल कातखडे आणि पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.

ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील तरूणाचा जामखेड तालुक्यात खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर तरूणाचा खून कोणी आणि का केला ? याचा तपास जामखेड पोलिस वेगाने करत आहेत. दरम्यान मृतदेहावर जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.