भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या : रोख दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी (Kolhewadi Sakat) येथे महिनाभरापुर्वी भरदिवसा झालेल्या घरफोडीतील आरोपीला मुद्देमालासह बेड्या ठोकण्याची कारवाई जामखेड पोलिसांनी (Jamkhed Police) बुधवारी पार पाडली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथील कैलास रघुनाथ सोंङगे (वय 30) यांच्या घरी दि 15 सप्टेंबर 2021 रोजी भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गु. र. नं. 420 /2021 भादवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. या प्रकरणात दोन लाख रूपयांची रोकड चोरीस गेली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथकाकडून वेगाने केला जात होता. सदर प्रकरणात कोल्हेवाडी येथील अनिकेत सुभाष सोंङगे याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार अनिकेत सोंडगे याला जेरबंद करण्यासाठी जामखेड पोलिसांनी कोल्हेवाडी परिसरात सापळा लावून त्याला उचलले. यावेळी अनिकेतकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याने चोरलेले दोन लाख रूपये पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले.

अवघ्या महिन्याभरात जामखेड पोलिसांच्या पथकाने भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकत रोख दोन लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावल्याने जामखेड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, पोहेकॉ. संजय लाटे, पोना. अविनाश ढेरे, पोकॉ. संग्राम जाधव, पोकॉ. संदिप राऊत, पोकॉ. विजय कोळी, पोकॉ. आबासाहेब आवारे, पोकॉ. अरुण पवार, पोकॉ. सचिन देवढे, पोकॉ. संदिप आजबे यांनी केली.