- Advertisement -

Rohit Pawar : रोहित पवार गरजले : माझी पाच वर्षे जेव्हा ते बघतील, तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झालेले असतील 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed constituency) सत्तांतर होऊन दोन वर्षे लोटली आहेत. या दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मतदारसंघात मागील काही दिवसांपासून आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे (Rohit Pawar Vs Ram Shinde) असा कलगीतुरा रंगलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.

मागच्या आठवड्यात माजी मंत्री राम शिंदे यांनी हळगावमध्ये (Halgaon) पवारांना लक्ष करत पवारांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. यावर आमदार पवारांनी बुधवारी हळगावमध्ये येऊन राम शिंदेंचा जोरदार समाचार घेतला. सध्या तरी शिंदे विरूध्द पवार या राजकीय युध्दाचे रणांगण हळगाव बनले आहे असेच दिसत आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांनी मागील आठवड्यात हळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना माझ्या काळात हळगाव ते पिंपरखेड दरम्यान वीज उपकेंद्र मंजुरीसाठी टाकले होते. पण ते काम माझ्या काळातील असल्याने अडवण्यात आल्याचा आरोप केला होता. आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. शिंदे यांचे आरोप खोटे आहेत असं सांगत पवार म्हणाले, राम शिंदे हे सातत्याने राजकीय भाष्य करत आहेत. त्यावर मी सातत्याने बोलावं असं काही नाही. मला जे काही महत्वाचं वाटतं ते मी करतो. लोकांमध्ये जातोय,आणि लोकांशी बोलतोय. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय असं सांगत पवार यांनी राम शिंदे यांना आपण जास्त महत्व देत नाही असे पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

पवार पुढे म्हणाले नायगावचे वीज उपकेंद्र मंजुर झाले आहे, तसेच चौंडीचे उपकेंद्र मंजुरीच्या प्रोसेसमध्ये आहे.जनतेच्या प्रश्नांवर कुठलीही तडजोड केली जाणार नाही असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीला दोन वर्ष पुर्ण झाले आहेत. मागील दोन वर्षात मागे वळून पाहताना काय वाटतं ? आणि पुढील तीन वर्षांचं व्हिजन काय असणार आहे ? असा प्रश्न विचारला असता आमदार रोहित पवार म्हणाले की, तुम्ही मला सहा महिने द्या, मी इथे आकडे सांगत नाही, राम शिंदे यांनी दहा वर्षांत जे केलं नाही ते मी दोन वर्षांत केलं आहे. मला आज काही बोलायचं नाही, मी आकड्यात खेळणारा व्यक्ती नाही, काम झालं पाहिजेल, कामं सुरू झाले पाहिजेल, त्यातून लोकांचं हित जोपासलं पाहिजेल एवढचं मला बोलायचं आहे, असं सांगत पवार यांनी आपला फोकस कामावर असल्याचा इरादा बोलून दाखवला.

पवार पुढे म्हणाले, आकडेचं दाखवायचेत पण मला अजून तीन वर्षे आहेत. अत्ताच ते इलेक्शनच्या गप्पा करायला लागलेत. माझी पाच वर्षे जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झालेले असतील कारण ते मंत्री असताना जे करू शकले नाहीत ते मी साधा आमदार असताना करून दाखवलेलं आहे. ते तर पाच पाच खात्याचे मंत्री होते असा जोरदार निशाणा आमदार रोहित पवार यांनी आमदार शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

आमदार पवार बुधवारी भलतेच आक्रमक मुडमध्ये होते. त्यांनी शिंदे यांच्या आरोपांची हवा काढून घेत आपण विकास कामांच्या बळावर पुढील तीन वर्षे वाटचाल करत राहणार हेच स्पष्ट केले आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार विरूध्द राम शिंदे या सामन्यात आता चुरस आल्याचे दिसू लागले आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर आता टिका करताना दिसत आहेत. पवारांनी केलेल्या हल्लाबोल आता राम शिंदे कसा परतवून लावतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पहा रोहित पवारांचा रुद्रावतार ⤵️

रोहित पवार म्हणतात राम शिंदेंनी दहा वर्षांत जे केलं नाही ते मी दोन वर्षांत केलं ⤵️

 

First Publisher : jamkhedtimes.com

Web Title: Rohit Pawar say When they see my five years, their eyes will be white

वेब शिर्षक: रोहित पवार म्हणतात माझी पाच वर्षे जेव्हा ते बघतील, तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झालेले असतील