- Advertisement -

महाबीजकडुन चौंडीतील 200 एकरात होणार उडीद बिजोत्पादन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: महाबीजकडुन यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यात तब्बल 200 एकरात उडीदाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जामखेड तालुक्यातील चौंडी या गावाची निवड महाबीजकडून  करण्यात आली आहे. (Mahabeej will produce urad seeds in 200 acres in Choundi)

शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच भागातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची पीक वाणाची मागणी, शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग, महामंडळाची संबंधित भागात बियाणे साठवणूक व प्रक्रियाक्षमता आणि बिजोत्पादनासाठी नैसर्गिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करून हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.

बिजोत्पादनासाठी जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी प्लॉट उपलब्ध करण्यात येणार आहेत. बीजोत्पादित करण्यात येणारे बियाणे हे शंभर टक्के खरेदी करण्याची हमी महामंडळाने घेतलेली आहे मात्र हे बियाणे धान्य म्हणून कोणत्याही व्यापाऱ्याला विकता येणार नाही. 01 नोव्हेंबर ते 31डिसेंबर या कालावधीत सरासरी उडीद बाजारभावावर 20 टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आह .कर्जत व जामखेडच्या एकूण २५० एकर क्षेत्रातून सरासरी ५ क्विंटल प्रति एकरप्रमाणे १२५० क्विंटल एवढ्या बियाणाचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.

जामखेड तालुक्याला साधारणत: 2000 क्विंटल सरासरी महाबीज बियाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 50 टक्के बियाणांची गरज आता तालुक्यातूनच भागणार आहे.सध्या चौंडी (ता.जामखेड) येथे सुमारे 150 एकराची बुकिंग पुर्ण झालेली आहे. तर कर्जतच्या पाटेगावमधूनही ५० एकराची बुकिंग पुर्ण झालेली आहे. एकंदरीत दरवर्षी शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी होणारी ससेहोलपट कायमची थांबणार आहे.

गतवर्षी उडीदाच्या बियाणांची मोठी कमतरता होती.मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य व परराज्यातील कंपन्यांशी संपर्क साधुन बियाणे उपलब्ध केले.मात्र यापुढे अशी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपणच आपले बियाणे निर्माण करावे असे वाटले आणि आता आपली अर्ध्याहून जास्त बियाण्यांची गरज आपल्या तालुक्यातूनच भागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मला वाटते अशी प्रतिक्रिया आ.रोहित पवार यांनी जामखेड टाईम्सशी बोलताना दिली.