जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. सरकारने दोन वेळा कडक लॉकडाऊन करून हातावर पोट असणाऱ्यांची कोणतीही दखल घेतली नाही.छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीने मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे नाराज होऊन बारामतीतल्या एका चहावाल्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवत पंतप्रधानांचे छोट्या व्यावसायिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. (Money order from Baramati tea seller to PM Narendra Modi )
बारामतीतील अनिल मोरे या चहावाल्याने थेट मोदीलाच पैसे पाठवले आहेत. बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावर एका दवाखान्यासमोर अनिल मोरे हे चहाची टपरी चालवतात. गेल्या दोन वर्षात कडक लॉक डाऊनने घर चालवणे बेजारीचे झाले आहे. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत माहिती देताना मोरे म्हणाले, पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्र वाढवावे.युवा पिढीला रोजगार द्या.
मोदी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. माझ्या छोट्याशा कमाईतून पंतप्रधान मोदीना दाढी करण्यासाठी मी 100 रुपये पाठवत आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात.आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना कमी लेखण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना परिस्थितीत आमच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रात कोरोना कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये मदत देण्याची मागणी मोरे यांनी केली आहे. तसेच या पुढे पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी 30 हजार रुपये द्या,अशी देखील मागणी मोरे यांनी केली आहे.