...

सावधान! बनावट दस्तनोंदणीचे दिवस संपले; ‘ओळखदार’ पद्धत इतिहासजमा, आता ‘आधार अ‍ॅप’ने होणार फेस व्हेरिफिकेशन!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जमीन, घरे तसेच इतर स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत तोतया व्यक्ती उभे करून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना आता कायमचा चाप बसणार आहे. दस्तनोंदणी प्रक्रियेत बनावट व्यक्तींचा वापर रोखण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘आधार पडताळणी’ (Aadhaar Verification) अनिवार्य केली आहे.

dastnondani aadhaar face verification new rules

राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ‘आय-सारिता १.९’ (i-Sarita 1.9) प्रणाली अंतर्गत ही ऑनलाइन सुविधा राज्यभरात लागू करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नोंदणीच्या वेळी साक्षीदार म्हणून दिली जाणारी जुनी ‘ओळखदार पद्धत’ आता कायमची बंद (इतिहासजमा) करण्यात आली आहे.

नेमका निर्णय काय?

आतापर्यंत दस्तनोंदणीच्या वेळी पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी ‘ओळखदार’ उभे केले जात होते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये बनावट किंवा भाडोत्री ओळखदार उभे करून बोगस दस्त नोंदवून घेतल्याच्या तक्रारी राज्यभरात वाढल्या होत्या. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने ओळखदारांची पद्धत पूर्णपणे बंद केली असून, दस्तनोंदणीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे अधिकृत आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे.

पडताळणीचे ३ पर्याय; आता ‘चेहरा स्कॅनिंग’चा नवा मार्ग

आधार पडताळणी सुरळीत पार पडावी यासाठी नोंदणी विभागाने नागरिकांसाठी त्रिस्तरीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  • अंगठ्याचे ठसे (Fingerprint): नियमितपणे बायोमेट्रिक यंत्रावर अंगठा स्कॅन करून पडताळणी.
  • बुबुळांचे स्कॅनिंग (Iris Scan): शेतकरी, ज्येष्ठ नागरिक किंवा कष्टकरी वर्गाच्या हाताचे ठसे उमटत नसल्यास डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅनिंग.
  • चेहरा पडताळणी (Face Authentication): अंगठ्याचे ठसे किंवा बुबुळ स्कॅनिंगमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास आता अधिकृत ‘आधार अ‍ॅप’च्या माध्यमातून थेट चेहरा स्कॅन करून पडताळणी करता येणार आहे.

फेस ऑथेंटिकेशन कसे होणार?

  • दस्तनोंदणी कार्यालयातील संगणकावर प्रथम एक विशेष संकेतचिन्ह (QR कोड) तयार होईल.
  • संबंधित नागरिकाने आपल्या मोबाईलमधील अधिकृत आधार अ‍ॅपमधून ते संकेतचिन्ह स्कॅन करायचे आहे.
  • त्यानंतर स्क्रीनवर स्वतःची संमती देऊन मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर चेहरा धरून पडताळणी पूर्ण करायची आहे.
  • पडताळणी यशस्वी होताच संगणकावर निकाल दिसेल आणि दस्तनोंदणीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या अटी व पूर्वतयारी:

कार्यालयात नोंदणीवेळी विनाकारण विलंब किंवा खोळंबा टाळण्यासाठी नागरिकांनी खालील बाबींची खात्री करावी

  • मोबाईल आवश्यकता: नागरिकांकडे अँड्रॉइड ९ किंवा त्यापुढील, अथवा आयओएस १६ किंवा त्यापुढील आवृत्तीचा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. मोबाईलचा कॅमेरा सुस्थितीत आणि इंटरनेट सुरू असावे.
  • अ‍ॅपची नोंदणी: दुय्यम निबंधक कार्यालयात येण्यापूर्वीच नागरिकांनी अधिकृत आधार अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील नोंदणी, सिम व्हेरिफिकेशन आणि स्वतःची फेस पडताळणी आधीच पूर्ण करून ठेवावी.
  • स्वतः प्रत्यक्ष उपस्थिती: संबंधित आधारधारकाने स्वतःचा नोंदणीकृत मोबाईल सोबत घेऊनच कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.
  • बायोमेट्रिक अनलॉक: आधारचे बायोमेट्रिक तपशील ‘लॉक’ असल्यास ते कार्यालयात जाण्यापूर्वीच अनलॉक करून घ्यावेत.

“कोणत्याही नागरिकाची आधार पडताळणी केल्याशिवाय आता दस्तनोंदणी होणार नाही. बनावटगिरी, तोतया व्यक्तींचा वावर आणि सर्वसामान्यांची होणारी आर्थिक फसवणूक समूळ नष्ट करण्यासाठीच ही त्रिस्तरीय पडताळणी व्यवस्था राज्यभरात लागू करण्यात आली आहे.” – अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक