स्वतःमधील क्षमता ओळखून उमेदच्या दशसूत्रीचे पालन करा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जातेगावमध्ये महिला बचत गटांना 27 लाखांचे कर्जवाटप
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महिलांनी स्वतःला अबला न मानता स्वाभिमानाने व्यवसायात पुढे आलं पाहिजे. त्यासाठी उमेद हा उपक्रम महत्वाचा आहे. स्वतःमधील क्षमता ओळखून उमेदच्या दशसूत्रीचे पालन केल्यास महिलांचा सर्वांगीण विकास होईल. महिलांनी छोट्या व्यवसायात उतरावे, ज्या महिलांनी धाडस करून व्यवसाय सुरु केले आहेत, त्या महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.
पंचायत समिती जामखेड व बँक ऑफ महाराष्ट्र जातेगाव शाखा यांच्या माध्यमांतून महिला स्वयंसहायता समूहांना 27 लाखांचे कर्जवितरण नुकतेच जातेगावमध्ये करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी प्रकाश पोळ बोलत होते.
यावेळी पंचायत विस्तार अधिकारी बापूराव माने, बँक ऑफ महाराष्ट्र जातेगाव शाखेचे मॅनेजर केशव तांदळे, ग्रामसेवक कैलास जाधव, प्रभाग समन्वयक हरिबा चांदगावे, उपसरपंच रविराज गायकवाड, सीआरपी वर्षा गायकवाड, अपेक्षा पाचणकर, कृषी सखी रेखा गायकवाड सह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, उमेदच्या माध्यमांतून विविध बँकांचे कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय केले पाहिजे. त्यातून अर्थार्जन सुरू झाले की, महिला सक्षमीकरण अधिक गतीने करता येईल. पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जाईल, महिलांनी आपल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी पुढे यावे असे अवाहन यावेळी पोळ यांनी केले.
दरम्यान, जामखेड पंचायत समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्र जातेगाव शाखा यांच्या माध्यमांतून जातेगाव येथील 11 महिला स्वयंसहायता समूहांना 22 लाखाचे तसेच माळेवाडी येथील 5 महिला स्वयंसहायता समूहास 5 लाखाचे असे एकुण 27 लाखांचे कर्ज वितरण जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांनी पोळ यांच्याकडे घरकुल व विविध योजनांचा लाभ गरजू महिलांना मिळण्याबाबत साकडे घातले.