आमदार राम शिंदेंनी मंजुर केलेल्या योजनेचे श्रेय राष्ट्रवादीने लाटू नये, जवळा भाजपचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मंजूर केलेल्या योजनेेेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने करू नये. आमदार राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच जवळा पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे विरोधकांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा जवळा भाजपने दिला आहे.

NCP should not take credit for the scheme approved by MLA Ram Shinde, BJP Attack NCP, jawala news, jamkhed latest news

जामखेड तालुक्यातील जवळा गावासाठी शिंदे – फडणवीस सरकारकडून जलजीवन मिशन योजनेंतर्गत 20 कोटी रूपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार रोहित पवार यांनीच योजना मंजूर करून आणली असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या दाव्याची भाजपकडून पोलखोल करण्यास सुरुवात झाली आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जवळा पाणी पुरवठा योजना मंजुर व्हावी यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य उमेश रोडे, नवनाथ कोल्हे, एकनाथ हजारे, प्रवीण लेकुरवाळे, राष्ट्रपाल अव्हाड, संजय हजारे, सुधीर मते तसेच भाजपा नेते तथा ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ दिपक वाळूंजकर, संतराम सुळ, उमेेश रोडे, राजेंद्र हजारे, प्रशांत पाटील, व्हाईस चेअरमन शिवाजी कोल्हे, अमोल पाटील, पोपट शिंदे, आयुब शेख यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेेर या पाठपुराव्याला यश आले.

आमदार राम शिंदे यांनी जवळा भाजप आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मागणीची दखल घेऊन 20 कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजुर व्हावी यासाठी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळेच योजनेला शिंंदे -फडणवीस सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.जवळा गावचा पाणी प्रश्न आमदार राम शिंदे यांनीच सोडवला आहे. कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा दावा जवळा भाजपने केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास सरकार सत्तेवर नाही, तर भाजप सरकार राज्यात सत्तेवर आहे. शिंदे – फडणवीस सरकारने जवळा पाणी योजना मंजुर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात हर घर नल ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमांतून जवळा गावासाठी पाणी योजना मंजुर झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून ही योजना होणार आहे. यात राष्ट्रवादीचा संबंध काय ? असा सवाल करत जवळा भाजपने राष्ट्रवादीच्या दाव्याची हवाच काढून घेतली आहे.

आमदार राम शिंदे यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळा पाणी पुरवठा योजना गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच कोट्यावधी रूपये खर्चाची पाणी योजना मार्गी लागली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार आमचे असताना राष्ट्रवादीचे लोक नाहक उड्या मारून योजनेचे श्रेय लाटण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करत आहेत तो हास्यास्पद आहे, अशी टीका जवळा भाजपने केली आहे.