जवळा येथील खाकसार वलीबाबांच्या ऊरूसास प्रारंभ, तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा येथील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सय्यद नूर खाकसार वलीबाबा यांचा ऊरूसास आज रविवारपासून (ता.२६) मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. दिवंगत सय्यद बु-हानहबीब शाह यांच्या प्रेरणेने होत असलेला हा ऊरूस तीन दिवस साजरा केला जातो. रविवारी (ता.२६) पहिल्या दिवशी गुसूल, कुराणखानी, मिलाद हा कार्यक्रम पार पडणार आहे. यादिवशी कुराणाचे पठण करतानाच, खाकसार वलीबाबा यांची कबर व दर्गा शुध्द पाण्याने धूवून गुलाबपाणी व अत्तराने स्वच्छ करून पुजा केली जाते.त्यानंतर मानाचा गल्लब कबरेवर चढवला जाणार आहे.

Khaksar Valibaba's Oroos started at jawala, organized various programs for next three days

सोमवारी (ता.२७) ऊरूसाचा मुख्य दिवस संदल कार्यक्रम आहे. दर्ग्याचे प्रतीक तयार करून, यादिवशी जवळा गावातून सवाद्य संदल मिरवणूक काढण्यात येते. संदल मिरवणूकीत गावातील तसेच बाहेर गावाहून आलेले सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. संदल मिरवणूकीनंतर दर्ग्याचे मुजावर कबरीची पुजा करून, फुलांची चादर कबरीवर चढविली जाते. त्यानंतर भाविकांना तबरुक (प्रसाद ) दिला जातो. यानंतर कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तिस-यादिवशी मंगळवारी (ता.२८) सर्व मुस्लीमबांधव तसेच अन्य धर्मीय लोक इच्छेनूसार फुलांची चादर चढवतानाच, नेवैद्य वाहतात. यादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या निमित्त दर्ग्या आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या ऊरूसामध्ये मुंबई, पुणे, ठाणे,औरंगाबाद सह राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळा येथे नांदणी (कवतुका) नदी किनारी असलेला दर्ग्याचा परिसर नयनरम्य असल्याने, याठिकाणी कायमच आल्हाददायक वातावरण असते. दर्ग्याचे बांधकाम खूप जूने पुरातन आहे.

दरम्यान दर्ग्याचे बांधकाम मोडकळीस आल्यानंतर सन १९८४ साली दिवंगत बु-हानहबीब शाह यांनी स्वयंस्फुर्तीने सुमारे दिड लाख रूपये खर्च करून दर्गा बांधला आणि त्याच वर्षापासून ऊरूस साजरा करण्यास सूरूवात केली. दिवंगत बु-हानहबीब शाह हे प्रथमपासून या दर्ग्याची सेवा करत आले आहेत.त्यांचे १५ वर्षापुर्वी सन २००८ साली निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव सय्यद अमीन बु-हान शाह आणि सय्यद हमीद बु-हान शाह यांनी या दर्ग्याची सेवा करण्यास प्रारंभ केला आहे.