जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिघोळ – माळेवाडी रस्त्यावरील अमराई ओढ्यावरील नुकत्याच पडलेल्या नव्या पुलाच्या निकृष्ट कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड शमा हाजी शेख यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसिलदार योगेश चंद्रे यांनी पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता अहमदनगर यांना सदर रस्त्याची चौकशी करून तातडीने अहवाल मागवला आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ – माळेवाडी या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेतून काम सुरु आहे. या भागात आमराई ओढ्यावर दोन ते तीन महिन्यांपुर्वी नव्या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसाने हा पुल पडला. ठेकेदार व संबंधित आधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने झालेले निकृष्ट दर्जाचे काम पावसाने उघडे पाडले.
कार्यकारी अभियंत्यांना गांभीर्य नाही
मुख्यमंत्री सडक योजनेचे अहमदनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, डेप्युटी इंजिनिअरला पाहणी करण्यासाठी सांगितले आहे.अहवाल आल्यानंतर पाहू, असे वेळकाढु पणाचे उत्तर दिले. पुल पडुन आठ दिवस झाले तरी अजुनही या भागात एकही अधिकारी फिरकलेला नाही. संबंधित ठेकेदाराच्या भ्रष्ट कामामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाचा करोडो रुपयांची निधी पाण्यात गेला की ठेकेदाराच्या खिशात? याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.