गावकऱ्यांची सतर्कता… ग्रामसुरक्षा यंत्रणा.. आणि तीन चोरटे गजाआड | gram suraksha yantrana, three thieves arrested, vigilance of Wagha villagers

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । भरदिवसा घरफोडी आणि चोरीच्या घटना रोज कुठे ना कुठे घडतात. अशीच एक घटना घडली असता, गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत ग्रामसुरक्षा यंत्रणेचा खुबीने वापर केला. नागरिकांना सतर्क केले. गावातील नागरिक गावात कोणी संशयितरित्या फिरतायेत का हे शोधू लागले आणि बघता बघता तीन चोरटे नागरिकांच्या तावडीत सापडले. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करून चोरट्यांना पोलिसांच्या हवाली केले. ही घटना वाघा या जामखेड तालुक्यातील गावातून उघडकीस आली आहे.

तर झाले असे की, जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा, वाघा या परिसरात भरदिवसा घरफोड्यांच्या घटना वाढल्या आहेत. या भागातील नागरिक भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परेशान झालेले असतानाच 15 जानेवारीला चोरीच्या काही घटना घडल्या.

पिंपळगाव आळवा गावात चोरी

पिंपळगाव आवळा येथील गणेश मधुकर ढगे यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. घरातून रोख 25 हजार व 90 हजारांचे दागिने असा लाखभर रूपयां ऐवज चोरीस गेला होता. ढगे यांच्यासह गावातही अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या.

वाघा गावात चोरी

पिंपळगाव आवळ्यात ज्या दिवशी चोरीची घटना घडली त्याच दिवशी वाघा गावातील सुमंत मारुती जगदाळे यांच्या घरीही चोरी झाली.चोरट्यांनी  जगदाळे यांच्या घरातून रोख 22 हजार व 42 हजारांचे दागिने चोरून नेले होते.जगदाळे यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली.

वाघा ग्रामस्थांची सतर्कता

काही सजग नागरिकांनी सदर चोरीच्या घटनेची माहिती तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सर्व ग्रामस्थांना दिली. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र जमले.गावात शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी हे तिघे संशयित दुचाकीवरून जाताना आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना पकडले.

पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल

त्यानंतर जामखेड पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी तातडीने धाव घेत वाघा गाव गाठले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले. नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरटे तात्काळ गजाआड झाले.

तिघे चोरटे गजाआड

जामखेड पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील आदित्य ऊर्फ सोंड्या गणेश पिंपळे ( वय 20)  तसेच जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती येथील प्रदीप ऊर्फ चक्या चंद्रकांत काळे (वय 21) बाबू फुलचंद काळे  (वय 24)  अश्या तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

वाघा ग्रामस्थांची कौतुकास्पद कामगिरी

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. पोलिस पाटील व सरपंच यांच्या सातत्याने बैठका घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे महत्व पटवून दिले होते. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. गावागावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. गावकारभारी या यंत्रणेचा सुयोग्य वापर करताना दिसत आहेत. वाघा गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा गावकारभारी व नागरिकांनी योग्य वापर करून चोरटे पकडण्याची बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.