जामखेड : जिंकेपर्यंत हार मानू नका – सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे, कृषि महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जीवन ही एक स्पर्धा आहे, जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत हार मानू नये, नव्या उमेदीने काम करावे आणि सांघिक भावना जपून यश प्राप्त करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

Don't give up until you win - Dr. Goraksh Sasane, Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College Annual Prize Distribution Ceremony concluded with enthusiasm

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज, १५ जून, २०२३ रोजी उत्साहात पार पडला. विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे,  विद्यार्थी परिषदेचे चेअरमन अश्रफअली शेख, संयोजक संचिता नवले, ओंकार दौंड, आश्लेषा डमरे, प्रजाली गोसावी, अक्षता जमादार सह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी परिषदेचे चेअरमन अश्रफअली शेख यांनी विद्यार्थी परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय  वर्षाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी 60 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

महाविद्यालयात पार पडलेल्या ‘उमंग २०२३’ कला व क्रीडा कार्यक्रमाअंतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, वादविवाद, बुद्धिबळ, कबड्डी, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर पार पडलेल्या स्पर्धांचा आढावा आकर्षक चित्रफितीमार्फत उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने घेतलेल्या सहभागाबद्दल महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अनारसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामध्ये शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. राहुल विधाते यांचा मोलाचा वाटा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. तर सूत्रसंचालन कु.प्रजाली गोसावी, कु.मानसी पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन कु.संचिता नवले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.