जामखेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियोजन आढावा बैठक : प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा – योगेश चंद्रे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मान्सून पूर्व तसेच मान्सून कालावधीत निर्माण होणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना याबाबत जामखेड तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.(Disaster Management Planning Review Meeting in Jamkhed, Prepare Disaster Management Plan for each village – Yogesh Chandre)

या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवण्याच्या सुचना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

सदर बैठकीमध्ये मान्सून पूर्व सर्व कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुख यांना देण्यात आल्या.यात प्रामुख्याने नगरपरिषदमधील नाले सफाई करणे,मोडकळीला आलेल्या व धोकादायक् इमारती पाडणे, धोकादायक झाडें तोडणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे,व इतर कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

तसेच विजवितरण विभागाने धोकादायक विज पोल ,अर्धवट लटकलेल्या वीजवाहक तारा,विज पोलच्या लगतची घातक झाडें तोडणे याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

ग्रामीण भागात आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना गतिमान व्हाव्यात यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या आपत्ती व्यव्यस्थापन आराखड्यामध्ये सर्व गावांची संपूर्ण माहिती सोबत राहणार असून आपत्ती काळात त्याचा उपयोग होणार आहे.

जलसंधारण विभागाने सर्व लघु मध्यम आणि मोठे प्रकल्प तपासून घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

बांधकाम विभागाने सर्व रस्ते,त्यावरील पूल याचे दुरुस्तीचे काम करून घ्यावे, शिक्षण विभागाने पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या शाळा तसेच निर्लेखित करावयाच्या इमारतीबाबत पाडण्याची कार्यवाही अगोदरच पूर्ण करून घेण्याच्या सक्त सुचना बैठकीत देण्यात आल्या.

आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे रोग येऊ नये म्हणून काळजी घ्यावी,सर्व प्रकारची औषध साठा ठेवावा,ग्राम पातळीवर साथीच्या आजाराबाबत जनजागृती करावी अश्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन नियोजन आढावा बैठकीत ठरल्या प्रमाणे त्या त्या विभागांकडून काय कार्यवाही झाली याचा 15 दिवसांनी आढावा घेण्यात येणार आहे, जो विभाग आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्यात दिरंगाई अथवा कुचराई करेल त्या विभागाविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिला आहे.

यावेळी पार पडलेल्या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका आरोग्य अधिकारी बोराडे सुनिल बोराडे , वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय कांबळे , महावितरणचे योगेश कासलीवाल गट शिक्षण अधिकारी कैलास खैरे सह आदी अधिकारी उपस्थित होते.