ऐन दिवाळीत मोठा धमाका, वाघा ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जामखेड तालुक्यात उडाली खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील वाघा ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना शासकीय जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी तीन सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश जारी केल्याने जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.ऐन दिवाळीत ही कारवाई झाल्याने त्या ग्रामपंचायत सदस्यांचे दिवाळं निघाल्याचा चर्चा तालुक्यात रंगली आहे.
जामखेड तालुक्यातील वाघा ग्रामपंचायत सदस्य संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीच्या गट नं. ३१३ मध्ये घर आणि शौचालयाचे बांधकाम करुन अतिक्रमण केले अशी तक्रार कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता.
वाघा ग्रामपंचायतीचे दुसरे सदस्य सूर्यभान दशरथ साळवे ग्रामपंचायत मालकीचा गट नं. ३१३ मध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम व वॉल कंपाऊंड, शौचालय बांधून शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचे सचिन सुभाष साळवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता.
वाघा ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या सदस्या आरती शिवाजी बारस्कर यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गट नं. २३३ मध्ये बेकायदेशीर रित्या कांदा चाळ उभारुन शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचे सोनाली उमेश बारस्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता.
वाघा येथील ग्रामपंचायत सदस्य संदिपान बापुराव बारस्कर, सूर्यभान दशरथ साळवे, आरती शिवाजी बारस्कर या तिघा सदस्यांनी शासकीय जागेतील अतिक्रमण करून शासकीय अनुदान लाटले. या तिन्ही सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केेेलेेल्या चौकशी तिन्ही सदस्य दोषी आढळल्याने तिन्ही सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यातील वाघा ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना ऐन दिवाळीत अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता जामखेड तालुक्यातील इतर गावांमधील ज्या सदस्यांनी शासकीय जागेतील अतिक्रमण करून शासकीय जागा लाटल्या आहेत अश्यांविरोधात प्रशासनाकडून कारवाई हाती घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अतिक्रमणधारक गावपुढार्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, वाघा ग्रामपंचायत ज्या तीन सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविण्याची कारवाई केली आहे त्यांना अपिलात जाण्याची संधी आहे. नाशिक विभागीय आयुक्तांकडे ते तीन सदस्य दाद मागणार का ? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचा आदेश कायम ठेवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.