पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उद्या नुकसानग्रस्त जामखेड भागाच्या दौर्यावर – आमदार राम शिंदे यांची माहिती
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उद्या सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी जामखेड तालुका दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.
जामखेड तालुक्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे तालुक्यातील बळीराजा हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रशासनाने हाती घेतले आहेत. अश्यातच, जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उद्या जामखेड दौर्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार राम शिंदे हेही असणार आहेत.
महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील सोमवार दि 24 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा भागाच्या दौर्यावर असणार आहेत. या भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे नऊ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने मंत्री विखे यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते खाजगी वाहनाने मोहरी, , तेलंगशी, खर्डा या नुकसानग्रस्त गावांना भेटी देणार आहे.
नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर खर्डा येथील सितारामगड येथे सकाळी अकरा वाजता आढावा बैठक घेणार आहेत.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जामखेड तालुक्यातील संकटात सापडलेल्या बळीराजासाठी उद्या कोणती मोठी घोषणा करणारे याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा 24 ऑक्टोबर 2022 रोजीचा जामखेड दौरा खालील प्रमाणे
- सकाळी 9:30 वाजता – हेलिकॉप्टरने आगमन
- सकाळी 9:40 वाजता – मोहरी येथे पाहणी
- सकाळी 10:10 वाजता – जायभायवाडी मार्गे तेलंगशीला प्रयाण
- सकाळी 10:20 वाजता – तेलंगशी येथे पाहणी
- सकाळी 10 : 50 वाजता – खर्ड्याकडे प्रयाण
- सकाळी 11: 10 वाजता खर्डा येथे पाहणी आणि सितारामगड येथे पाहणी
- दुपारी 12 :05 वाजता – खर्डा येथून श्रीगोंद्याकडे हेलिकॉप्टरने प्रयाण