Big Breaking | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिला राजीनामा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात आज तब्बल साडेतीन तास सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावत उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आठ दिवसापूर्वी बंड पुकारले होते. शिवसेनेतील तब्बल 38 आमदार शिंदे यांच्या बंडात सामील झाले होत. यामध्ये आठ मंत्रांचा समावेश होता तर दहा पेक्षा अधिक अपक्षांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला होता. गेल्या आठ दिवसांपासून हे सर्व बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी या शहरात तळ ठोकून होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते, शिवसेनेतील बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र एकनाथ शिंदे यांनी आपले बंड कायम ठेवले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर सरकार नको, भाजपबरोबर युती करा अशी मागणी या गटाची होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाची मागणी धुडकावून लावत महाविकास आघाडीची सत्ता राज्यात राहणार असा निर्धार केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड कायम राहिले.

दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला होता. भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात असून या सरकारला बहुमत चाचणीस सामोरे जाण्याचे सांगावे असे पत्र दिले होते. त्यानंतर राज्यपालांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीस सामोरे जाण्यास आदेश दिले होते.

या निर्णयाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात आज सायंकाळी या संदर्भात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत शिवसेनेची याचिका फटाळली आणि उद्या ठाकरे सरकारने बहुमत चाचणीस सामोरे जावे असे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.