शरद पवार होणार UPA चे अध्यक्ष? राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव मंजुर !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । UPA President : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधकांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यातच UPA च्या अध्यक्षपदी कोण असणार याची अनेकदा चर्चा रंगलेली असते, त्यादृष्टीने एक महत्वाची राजकीय घडामोड मंगळवारी समोर आली आहे. (Sharad Pawar to be UPA president? National Youth Congress National Executive Resolution Approved)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भारतातील सध्याच्या कठीण राजकीय काळात शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत UPA च्या अध्यक्षपदाचा मुद्दा समोर आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहे.

या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आजच्या तारखेत देशातील सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात.”

या बैठकीत मेहबूब शेख यांनी शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष म्हणून निवडावे हा प्रस्ताव मांडला. जो एकमताने मंजूर झाला आहे. दरम्यान, देशात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातच सत्ता असलेल्या पंजाबलाही काँग्रेसला गमवावे लागले आहे. या निडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या मागणीने जोर धरला होता.

त्यातच आता संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) जनक असलेल्या काँग्रेसलाच यूपीए अध्यक्षपद सोडण्याची मागणी मित्र पक्ष करताना दिसत आहेत. सध्या यूपीए अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडे आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शरद पवार यांना UPA चे अध्यक्षपद देण्यात यावे असा ठराव मंजूर केल्याने राष्ट्रवादीच्या या प्रस्तावावर काँग्रेससह UPA चे घटक पक्ष असलेल्या इतर पक्षांकडून काय प्रतिक्रिया येत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.