महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र  : राज्यात उष्माघाताने घेतला पहिला बळी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची लाट सक्रीय झाली आहे. येत्या काही दिवसांत ही लाट अधिक तीव्र होणार आहे. राज्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. ही घटना जळगावमधून समोर आली आहे. (Heat wave intensifies in Maharashtra, first victim of heat stroke in Jalgaon district,)

उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रात धडकली आहे. राज्यात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात ही लाट सक्रीय आहे. या भागात पारा 42 पार झाला आहे. जळगावमध्ये या लाटेचा प्रभाव जाणवत आहे. अंगाची लाहीलाही करणारा उष्णतेचा हा कहर येत्या आठवडाभर कायम राहणार आहे.

दरम्यान उष्णतेच्या लाटेने राज्यातील पहिला बळी जळगाव जिल्ह्यात घेतला आहे. जळगावमधील मांडळ (अंमलनेर) या गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र संजय माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जितेंद्र माळी हे दिवसभर आपल्या शेतात काम करत होते. सायंकाळच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले होते. त्यांना चुलत भाऊ महेंद्र व मजुरांनी खासगी डॉक्टरांकडे दाखल केले.

प्रथमोपचार करून जितेंद्र यांना अमळनेरला नेत असताना ते बेशुद्ध पडले; यातच त्यांचा मृत्यु झाला. ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. मयताला उष्माघात सदृश्य लक्षणे होती व मेंदूत रक्तस्राव झाला असल्याचे डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले.

बारामतीत उष्माघाताने तीन शेळ्यांचा मृत्यू

उष्मघातामुळे बारामती तालुक्यात तीन शेळ्या एकाच दिवशी दगावल्या आहेत. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालेच आहे पण उष्मघातामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. हिवाळ्यात गारठ्यामुळे शेळ्या दगावल्याच्या घटना घडल्या होत्या तर आता वाढत्या उन्हाचा परिणाम समोर येऊ लागला आहे.

उन्हामुळे भर दुपारी एकाच वेळी झारगडवाडी शिवारातील तीन शेळ्या दगावल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यानंतर शेतकरी गोपीनाथ बोरकर यांनी संबंधित घटनेची पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. या तीन शेळ्यांचा मृत्यू हा उष्मघातानेच झाल्याचे पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय उर्वरीत शेळ्यांची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.