रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर केला जोरदार पलटवार | Rohit Pawar retaliates strongly against Chandrakant Patil in Twitter

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। सत्तार शेख |  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) विरूध्द माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) हा संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. या संघर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) उडी घेतली असून आमदार रोहित पवारांवर पाटलांनी जोरदार टीका केली.या टीकेला उत्तर देताना पवारांनीही चंद्रकांत पाटलांवर पलटवार करत जोरदार समाचार घेतला. (Rohit Pawar retaliates strongly against Chandrakant Patil in Twitter)

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत (Karjat Nagar Panchayat election campaign) प्रचाराच्या रणधुमाळीने वातावरण चांगलेच पेटले आहे. या पेटलेल्या राजकीय धुराळ्यात शुक्रवारी मोठा भडका उडाला. राष्ट्रवादीच्या खेळीने भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीच्याच रिंगणातून माघार घेतली आणि राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला . या सर्व प्रकाराची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.

नागरिकांच्या भविष्याबाबत चिंता करण्याची गरज नाही

या टीकेला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, तुम्ही कर्जत नगरपंचायत आणि इथल्या नागरिकांच्या भविष्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसंच धनशक्तीच्या बळावर लोकांना पक्षात घेता येतं असं तुमचं म्हणणं असेल तर आजवर तुम्ही ज्यांना भाजपमध्ये घेतलं ते धनशक्ती आणि ED सह इतर केंद्रीय यंत्रणांच्याच बळावर,असाच याचा अर्थ नाही का होत? असा सवाल करत जोरदार पलटवार केला आहे.

मी का घेतलं यापेक्षा ते माझ्याकडे का आले?

पवार पुढे म्हणाले की, चंद्रकांत दादा आपण ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळं आपल्याविषयी मला आदर आहे. पण मी हे समजू शकतो की, नाईलाजाने तुम्हाला हे ट्विट करावं लागतंय. कर्जतमधील भाजप उमेदवारांना मी का घेतलं यापेक्षा ते माझ्याकडे का आले? हे तुम्ही समजून घेण्याची खरी गरज आहे असा खोचक सल्लाच रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांनी दिला.

तुम्ही लिहिलं असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे

तसेच पवार पुढे म्हणाले की, राहिला प्रश्न तुमच्या इतर मुद्द्यांचा, तर ते तुम्ही लिहिलं असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे, पण तुम्हाला लिहून दिलं असेल तर त्याचा विचार करायची गरज नाही. आमचा लोकशाहीवर आणि इथल्या मायबाप जनतेवर विश्वास आणि प्रेम आहे आणि घोडामैदानही जवळच आहे असा थेट इशारा आमदार पवार यांनी चंद्रकांत पाटलांना दिला. आमदार पवारांनी केलेल्या पलटवारावर चंद्रकांत पाटील काय प्रत्युत्तर देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटलांनी साधला रोहित पवारांवर निशाणा

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे अशी जोरदार टिका करत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता,अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना ऐकेका जागेसाठी झुंजावे लागते याचाच अर्थ जनता भाजपसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, असे सांगत सत्तेचा दुरुपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा असे अवाहन चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

 हा सत्तेचा दहशतवाद – राम शिंदे

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत शुक्रवारी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांनी ज्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या त्यातील प्रभाग 14 च्या महिला उमेदवाराने भाजपची साथ सोडत थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. या सर्व घडामोडीवर बोलताना राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीची सारे मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.

कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले आज प्रभाग 14 मधील भाजपच्या उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला. सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. हा सत्तेचा दहशतवाद असून जनता तुम्हाला माफ करणार नाही असे ट्विट करत राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 विखे व शिंदेंना पवारांनी दिला जोर का झटका

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढवत असलेल्या शिबा तारक सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या ताराबाई कुलथे यांना मंत्री धनंजय मुंडे, हार्दिक पटेल,आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या अगोदरच जोगेश्वरवाडी आणि सोनारगल्ली दोन जागा बिनविरोध करीत माजीमंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांना जोर का झटका दिला. (Rohit Pawar retaliates strongly against Chandrakant Patil in Twitter)