Vidhanparishad Election 2022 । भाजपकडून राम शिंदेंसह पाच जणांच्या उमेदवारीची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। अगामी 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या उमेदवारांची घोषणा केली.यामध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह पाच उमेदवारांची घोषणा केली. ( Vidhanparishad Election 2022 BJP announces five candidates including Ram Shinde)

भाजपकडून जाहिर करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे

  1. प्रविण दरेकर
  2. राम शिंदे
  3. प्रसाद लाड,
  4. श्रीकांत भारतीय
  5. उमा खापरे

राम शिंदे विधान भवनात दाखल

विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे आणि प्रवीण दरेकर हे आपल्या समर्थकांसह विधान भवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात या दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषदेची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर रात्रीतूनच कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्यभरातील शिंदे समर्थकांनी मुंबई गाठली. राम शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत आनंदोत्सव साजरा केला.

राम शिंदेंचे व्हाट्सअप स्टेटस खरे ठरले

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी काल व्हाट्सअपवर एक स्टेटस ठेवले होते. सकाळपासून त्या स्टेटसची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती या स्टेटसमध्ये राम शिंदे यांनी म्हटले होते की, मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारे पर घर मत बना लेना…मै समंदर हूँ…लौटकर वापस आऊंगा.. अखेर राम शिंदे यांनी लिहिलेल्या त्या ओळी खऱ्या ठरल्या आहेत.

कर्जत- जामखेडमध्ये भाजपचा जल्लोष

दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच कर्जत जामखेडमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांसह जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला

भाजपकडून राम शिंदेंचे पुनर्वसन

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला होता. राज्याचे माजी मंत्री राम शिंदे हे गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते, गेल्या अडीच वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये माजी मंत्री राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष सुरू होता.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नववे वंशज असलेल्या राम शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. धनगर आणि ओबीसी समाजातील महत्त्वाची नेते अशी ओळख असलेले राम शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या गुड बुकमधील नेते म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. अखेर भाजपने राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत राजकीय पुनर्वसनाचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.

पंकजा मुंडेंचा पत्ता कट

भाजपने 10 विधान परिषेदेच्या जागांसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. या पाच उमेदवारांचे अर्ज आता भरले जाणार आहेत. आमच्या पार्टीत सर्वजण कोरी पाकीट असतो. जो पत्ता लिहील तिथे जावं लागतं. त्यामुळे राजकारणात चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते आणि निर्णय हा शेवटी पक्षाचे असतात. त्यामुळे केंद्राने केलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी त्याचे पालन करायचे असते. पंकजा ताई यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्राने काही भविष्यातील विचार करुन हा निर्णय घेतला असावा असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, ईच्छा व्यक्त करणे आणि नाराजी व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र भाजपातील नाराजी लगेच भरली जाते. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आणखीनही कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.