रोहित पवारांना धक्का, कर्जत तालुक्यात भाजपने उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा, राजेंद्र फाळके व राजेंद्र गुंड यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत तालुक्यात पार पडलेल्या 3 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी आलेला हा निकाल राष्ट्रवादी पर्यायाने आमदार रोहित पवार यांना धक्का देणारा ठरला आहे. तर आमदार राम शिंदे यांची कर्जत – जामखेड मतदारसंघात जादूची कांडी पुन्हा फिरू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज हाती आले. यात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. तीनही ग्रामपंचायतवर भाजपने झेंडा फडकावला आहे असे ट्विट आमदार राम शिंदे यांनी केले आहे.

आगामी निवडणूकांआधी भाजपने मिळवलेले हे यश कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चेत आले आहे. या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन मातब्बर नेत्यांच्या पॅनलला आपल्याच गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकुणच मतदार संघात वारं फिरू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याच गावात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. कोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने 13 पैकी 07 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. माजी सभापती तथा भाजपा नेते बापुराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोरेगावात चमत्कार घडवून आणत ग्रामपंचायतवर झेंडा फडकावला.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड यांच्या कुळधरण गावात भाजपने मुसंडी मारली आहे. या ठिकाणी 13 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यात भाजपचे 7 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. कुळधरणमध्ये मंगेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवले.

तर बजरंगवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने 7 पैकी 5 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. या भागातील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले होते परंतू त्याचा भाजपवर कुठलाच परिणाम झाला नसल्याचे या निवडणुकीतून समोर आले. जनता भाजप पर्यायाने राम शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच तीन वर्षांपासून आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार असा संघर्ष सुरु आहे. गेल्या अडीच वर्षांत आमदार रोहित पवारांनी भाजपला हादरे देण्याचा सपाटा लावला होता, अनेकांचे पक्षांतर घडवले होते. परंतू अडीच वर्षानंतर मतदारसंघात राजकीय परिस्थिती बदलू लागली आहे.

राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून तर मतदारसंघाचे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. याचाच परिणाम कर्जत तालुक्यात पार पडलेल्या 3 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून अधोरेखित होत आहे. राम शिंदेंना जनतेतून पाठबळ मिळताना दिसत आहे. आमदार रोहित पवारांसाठी ही धोक्याची घंटा आहे.