कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का, 11 पैकी 7 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, आमदार राम शिंदेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेने दाखवला विश्वास !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.मंगळवारी या निवडणुकीचे निकाल हाती आले.11 ग्रामपंचायत निवडणुकीत 7 ठिकाणी भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. सदस्य निवडीतही भाजपने जोरदार मुसंडी मारली. एकुणच हा निकाल आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. तर आमदार राम शिंदे यांचे हात बळकट करणारा आहे.

Shock for Rohit Pawar in Karjat-Jamkhed Constituency, BJP flag on 7 out of 11 Gram Panchayats,ram shinde latest news,

कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये कर्जत तालुक्यातील 8 तर जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश होता. ही निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढली गेली,परंतू जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात याव्यात यासाठी आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. पवार विरूद्ध शिंदे हा संघर्ष या निवडणुकीतही पहायला मिळाला. दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठी रसद पुरवत ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेची केल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल मंगळवारी लागले.

कर्जत – जामखेड मतदारसंघात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अगामी बाजार समिती निवडणुकांची लिटमस चाचणी होती, यात पवार बाजी मारणार की शिंदे यावर पुढील रणनिती ठरणार असेच बोलले जात होते, अखेर निकाल समोर आले, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली. कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 पैकी 7 गावांवर भाजपने कब्जा केला. त्यामुळे अगामी बाजार समिती निवडणुकीत भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांचा उत्साह अधिकच दुणावला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजुरी, रत्नापुर, शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, निंबे, कोपर्डी, म्हाळंगी, मुळेवाडी, बहिरोबावाडी, कौडगे या 11 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी हाती आले. यामध्ये शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, म्हाळंगी, मुळेवाडी, कौडाणे, 6 ठिकाणी भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले, बहिरोबावाडीत भाजपा मित्रपक्षांचे सरपंच विजयी झाले, तर कोपर्डीत अपक्ष सरपंच झाला आहे. राजुरी आणि निंबे गावात राष्ट्रवादीचा सरपंच झाला पण बहुमत भाजपला मिळाले. राष्ट्रवादीचे रत्नापुर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत सरपंच झाले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचाच बोलबाला आहे. मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये एकुण 95 ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 51 सदस्य निवडून आले, तर राष्ट्रवादीचे अवघे 20 सदस्य निवडून आले. तसेच 21 ठिकाणी स्थानिक विकास आघाडी आणि अपक्षांचे एकुण 21 सदस्य निवडून आले. अवघ्या 3 जागांवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले.

राष्ट्रवादीला जनतेने नाकारले

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे रत्नापुर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत सरपंच झाले. परंतू निंबे आणि राजुरीत भाजपाचे बहुमत आहे. एकुणच संपुर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीला बहुमत असलेली रत्नापुर ग्रामपंचायत जिंकता आली. तेथेही राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे. एकुणच ग्रामपंचायत निकालातून जनतेने आमदार रोहित पवारांना नाकारल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या गावात भाजपची मुसंडी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांच्या आळसुंदे गावात भाजपने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायतवर कब्जा मिळवला. याठिकाणी भाजपचे 11 पैकी 8 सदस्य विजयी ठरले. विशेष म्हणजे सरपंचपदाचे उमेदवार स्मिता जिजाबाई अनारसे ह्या मतदारसंघात सर्वाधिक 435 मतांनी विजयी झाल्या. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर येथील जनतेने विश्वास दाखवला. काँग्रेसचा या ठिकाणी मानहानिकारक पराभव झाला.

याच वर्षी कर्जत तालुक्यात झालेल्या तीन ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा राजेंद्र गुंड या दोन्ही नेत्यांच्या गावात भाजपने मुसंडी मारली होती. आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या गावात भाजपने मुसंडी मारली. राष्ट्रवादीचे जामखेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या गावातही राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याची भाजपची संधी थोडक्यात हुकली. राष्ट्रवादीला रत्नापुरात काठावरचे बहुमत मिळाले.