काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कर्जत भाजपचा आक्रमक पवित्रा, पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (INC Nana Patole) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरले आहेत. भाजपने (BJP Maharashtra) महाराष्ट्रात आक्रमक होत पटोलेविरोधात मोठी मोहिम उघडली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर पडदा पडेल असे वाटत असतानाच पटोले हे रोजच भाजपला डिवचत आहेत. चवताळून उठलेल्या भाजपने आता राज्यात पटोलेविरोधात मोहिम उघडली आहे.

नाना पटोले यांच्या विरोधातील पडसाद आता कर्जत (Karjat Taluka) तालुक्यात आज उमटले. आक्रमक झालेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्जत पोलिस स्टेशन गाठत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल काही दिवसांपासून आक्षेपार्ह विधान करुन त्यांना खुलेआम मारण्याची भाषा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. देशाच्या प्रमुख व्यक्ती बद्दल असे विधान करणे निषेधार्ह आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अक्षपार्य वक्तव्य करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा कर्जत तसेच समस्त देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांस आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, भाजपा तालुकाध्यक्ष डाॅ सुनिल गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, तात्या साहेब माने, पप्पुशेठ धोदाड, शोएब काझी, सुनिल यादव, गणेश पालवे, शेखर खरमरे, ॲड हरिश्चंद्र राऊत, गणेश डोंबाळ, पांडुरंग भंडारे, सोमनाथ कोल्हटकर,पुरुषोत्तम भिसे, सह आदी भाजपा कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

भाजपा कार्यकर्त्यांनी आज कर्जत पोलिस स्टेशनला जाऊन निवेदन दिले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी लगेच गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती.