ओरिसा राज्यातून खून करून पळालेल्या खुन्यास जामखेडमध्ये बेड्या, सलग दुसऱ्या दिवशी जामखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका खून प्रकरणातील आरोपी अटक करून चोवीस उलटत नाही तोच जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने आणखीन एक दमदार कामगिरी केली आहे.

ओरिसा राज्यातील सुलेपट पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून करून सन 2018 पासून परागंदा असलेल्या जामखेडमधील एका आरोपीला बेड्या ठोकण्याची कामगिरी जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे.

ओरिसा राज्यातील सुलेपट पोलीस स्टेशन गु.र.नं. 165/2018 भादवि कलम 302 अनुसार एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यासाठी ओरिसा पोलिस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत, पोसई.चेतन ,पोलीस हवालदार नागेंद्र तलवार हे तपास करत होते परंतू त्यांना यश येत नव्हते.

खुन प्रकरणातील फरार आरोपी पारस छगन काळे हा जामखेड येथे असल्याची खात्रीशीर माहिती ओरिसा पोलिसांना मिळाली होती. ओरिसा पोलिसांनी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना या गुन्हयातील आरोपीबाबत माहिती देत आरोपी पकडण्यास सहकार्य करण्याची विनंती केली.

त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाने 23 जानेवारी रोजी पहाटे 05 च्या सुमारास फरार आरोपी पारस छगन काळे याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई आरोळे वस्ती भागात करण्यात आली. आरोळेवस्ती येथील राहत्या घरातून आरोपीला जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर आरोपीस सुलेपट पोलीस स्टेशन (राज्य ओरीसा) चे उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरामत, पोसई.चेतन ,पोलीस हवालदार नागेंद्र तलवार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या खूनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना शिताफीने जेरबंद करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कामगिरी केल्याने जामखेड पोलिस दलाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुलेपट पोलीस स्टेशन (राज्य ओरीसा) चे उपविभागीय पोलीस अधिकारी.विरय्या हिरामत पोसई.चेतन ,पोलीस हवालदार नागेंद्र तलवार, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पो.उप.नि.राजु थोरात, पोना.अविनाश ढेरे, पोकॉ. संग्राम जाधव, अजय साठे, पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ. विजय कोळी, पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार, पोकॉ.संदिप आजबे ,पोकॉ.सचिन देवढे, पोकॉ बाळु खाडे यांनी केली आहे.

जामखेड पोलिसांनी पकडलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्याची यशस्वी कारवाई पार पाडत जामखेड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या चमकदार कामगिरीचा परिचय करून दिला आहे.