कर्जत-जामखेडमध्ये साकारले जाणार “नमो उद्यान” प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून २ कोटींचा निधी मंजूर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण योजना” अंतर्गत कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपरिषद यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. एकूण २ कोटी रुपयांच्या या निधीतून कर्जत आणि जामखेड शहरात भव्य “नमो उद्यान” उभारले जाणार आहे. हा निधी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे.

कर्जत व जामखेड शहरातील नागरिकांना विरंगुळ्याचे, हिरवाईचे आणि आरोग्यपूर्ण जीवनाचे हक्काचे उद्यान असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेऊन प्रा. राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला आणि अखेर राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.
शहरातील नागरिकांसाठी “उद्यान” का महत्त्वाचे?
शहरातील नागरिकांना उद्यानाची गरज ही केवळ विश्रांतीसाठी नसून आरोग्य, पर्यावरण व सामाजिक एकात्मतेसाठीही आहे. व्यायाम, चालणे, मुलांचे खेळ, ज्येष्ठांसाठी निवांतपणा, तरुणांसाठी तणावमुक्ती अशा विविध अंगांनी उद्यान नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवते.
हिरवळ व ताजी हवा हे शहरी जीवनातील प्रदूषणावर औषध ठरते. त्यामुळेच प्रत्येक शहरात सुसज्ज उद्यान असणे ही आजच्या काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर “नमो उद्यान” प्रकल्प कर्जत व जामखेड शहरात उभारले जाणार आहेत.
विकासाला चालना देणारा प्रकल्प
“नमो उद्यान” प्रकल्पामुळे शहर सौंदर्यीकरणाबरोबरच सामाजिक एकात्मता आणि नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार आहे. शहरी जीवनात वेगवान बदल होत असताना अशा प्रकारचे आधुनिक उद्यान नागरिकांना आराम, आरोग्य आणि सामाजिक मैत्रीपूर्ण वातावरण प्रदान करेल.
कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरांमध्ये उभारण्यात येणारे “नमो उद्यान” हे फक्त एक उद्यान न राहता, आरोग्य, पर्यावरण, सौंदर्यीकरण आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम घडवणारा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना लवकरच हिरवाईचे वरदान मिळणार आहे.
प्रा. राम शिंदेंनी मानले सरकारचे आभार
“नमो उद्यान” या महत्त्वपूर्ण प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.