Big Breaking : विधानपरिषदेसाठी भाजपकडून राम शिंदेंची उमेदवारी फिक्स,अखेर राम शिंदेंचे ‘ते’ WhatsApp स्टेटस खरे ठरले, कर्जत जामखेडमध्ये जल्लोष !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख।  गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा निर्णय भाजपने घेतला आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी आज ठेवलेले व्हाट्सअपचे ‘ते’ स्टेटस खरे ठरले आहे. (Big Breaking: WhatsApp status from Ram Shinde finally came true; BJP announces Ram Shinde’s candidature for Legislative Council)

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत उद्याची आहे. त्याआधीच सर्वच राजकीय पक्षांनी विधानपरिषदेच्या उमेदवारांंची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना होती. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राम शिंदे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे.

भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी सात जण स्पर्धेत होते. त्यामध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील कुटुंबातील नववे वंशज आहेत. तसेच ते धनगर समाजातील राज्यातील मोठे नेतृत्व आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गटातील सहकारी म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव राज्यसभा उमेदवारीसाठी भाजपच्या दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आले होते, मात्र त्यावेळी त्यांची लॉटरी लागली नाही. मात्र आता भाजपकडून विधानपरिषदेसाठी राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. “आज सायंकाळी सात वाजता भाजप हायकमांडने माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि विधान परिषदेच्या उमेदवारी विषयी माहिती दिली असे माजी मंत्री राम शिंदे जामखेड टाइम्सशी बोलताना म्हणाले.

राम शिंदे यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसकडे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. राम शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. ही चर्चा खरी ठरली.येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. या घोषणेमुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ सह राज्यातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राम शिंदेंचे ‘ते’ व्हाट्सअप स्टेटस खरे ठरले

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी आज व्हाट्सअपवर एक स्टेटस ठेवले होते. सकाळपासून या स्टेटसची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती या स्टेटसमध्ये राम शिंदे यांनी म्हटले होते की, मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारे पर घर मत बना लेना…मै समंदर हूँ…लौटकर वापस आऊंगा.. अखेर राम शिंदे यांनी लिहिलेल्या त्या ओळी खऱ्या ठरल्या आहेत.

कर्जत- जामखेडमध्ये भाजपचा जल्लोष

दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच कर्जत जामखेडमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांसह जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.