अहमदनगर : तरूणांना जागतिक पातळीवर कौशल्य दाखवण्याची संधी,फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे करा पटकन नावनोंदणी !

अहमदनगर, दि.३०जून २०२३ : World Skills Competition 2024 France Lyon : : सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धकांचे नामांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील युवक-युवतींनी महास्वयंम वेबपोर्टलवर (mahaswayam) नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

World Skills Competition 2024 France Lyon, An opportunity for youth of Ahmednagar district to show their skills at global level, participate in global skills competition in France, Register here quickly,

ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी.

यापुर्वी ४६ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ सेक्टरमधून ५० देशातील दहा हजार उमेदवार समाविष्ट झाले आहेत. ही स्पर्धा १५ देशात १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित केली आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे.या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि.१ जानेवारी २००२ किंवा तद्नंतरचा असावा. तसेच, आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, १९९९ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम एस एम इ टुल रूम्स, आय आय टी, सिपेट, तंत्रनिकेतन महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालये, आयएएचएम हॉस्पिटटेलिटी इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.

तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्याकडून करण्यात येईल. यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देऊन नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. असे आवाहन श्री.सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.