जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचे सर्वधर्म समभाव आणि समतेचे तत्व सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या या शिकवणूकीची प्रेरणा आत्मसात व्हावी यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चोंडीत जयंती करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल अशी मोठी घोषणा राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौंडी येथे बोलताना केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील ‘चौंडी’ या त्यांच्या जन्मगावी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून भव्य अशा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, अण्णा डांगे, अनिल गोटे, भूषणसिंह राजे होळकर, अक्षय शिंदे, किशोर मासाळ यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अहिल्याबाईंनी अठ्ठावीस वर्षे राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालविला. त्यांचा राज्यकारभार आदर्श होता. त्याला जगात तोड नाही. त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी ‘चौंडी’येथे म्युझियम उभारणार येईल. ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी सर्व धनगरवाडीपर्यंत ग्रामविकास विभागातर्फे रस्ते बांधण्यात येतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा ऐतिहासिक आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या बरोबर राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे स्मरण देशात नेहमीच केले जाते असे सांगत कर्जत-जामखेड परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यासह या भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची सूचना यावेळी शरद पवार यांनी केली.

प्रास्ताविकात आमदार रोहित पवार यांनी आज चौंडी येथील नियोजित विकास कामे करण्यासह परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांनी ‘चौंडी’ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.