12 ते 14 जूलै या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात 12 ते 14 जूलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 72,717 क्यूसेस व भिमा नदीस दौंड पूल येथे 33,723 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 173.3 मि.मी. (38.7 %) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 72,717 क्युसेस तसेच भिमा नदीस पुणे जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे 33,723 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री) किंवा 0241 – 2323844 / 2256940 वर संपर्क साधावा असे आवाहनही संदीप निचित यांनी केले आहे.