जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) कोपरगाव (Kopargaon) आणि श्रीरामपूर (Shrirampur) या तीन तालुक्यांमध्ये मंगळवारी घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सहाजण बुडाले आहेत. या घटनांमुळे अहमदनगर जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Shocking: Six people drowned on the same day, a mountain of grief collapsed on Ahmednagar district)
राहुरीतील गणपती घाट परिसरातील मुळा नदीपात्रात दोन सख्खे भाऊ वाहून गेले आहेत. नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता, तर ओढय़ात मासे पकडण्यासाठी गेलेले दाम्पत्य वाहून गेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तर कोपरगावातील मुर्शदपूर गावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
राहुरीतील अमर चंद्रकांत पगारे (वय 15), सुमित चंद्रकांत पगारे (वय 12) हे दोघे, श्रीरामपुरातील मंजाबापू भागवत गायकवाड (वय 45), चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय 40) हे वाहून गेले असून, कोपरगावातील संजय मारुती मोरे (वय 35) व मुलगा सचिन संजय मोरे (वय 15) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. (Shocking: Six people drowned on the same day, a mountain of grief collapsed on Ahmednagar district)
राहुरीत सख्खे भाऊ बुडाले
राहुरी तालुक्यातील लोहार गल्ली परिसरात राहणारे अमर पगारे, सुमित पगारे, समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे, रेहान शेख हे पाच मित्र दुथडी भरून वाहणाऱ्य़ा मुळा नदी (mula River) पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, सुमित हा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आल्याने मोठा भाऊ अमर याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पंकज नारद, उत्तम आहेर, शाहरूख शेख, सिद्धार्थ करडक या तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यर्थ ठरला. पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली. मुळा नदीच्या पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने सायंकाळपर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.
श्रीरामपुरात मासे पकडण्यासाठी गेलेले दाम्पत्य बुडाले
श्रीरामपूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील माळेवाडी परिसरातील सोमवारी रात्रभर अतिमुसळधार पावसाने अनेक ओढय़ा-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. माळेवाडी येथील रहिवाशी असलेले मंजाबापू गायकवाड हे पत्नी चंद्रकलासमवेत मासे पकडण्यासाठी एका ओढय़ावर गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक पाण्यात पडले. आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. शोध सुरू केला असता, चंद्रकला यांचा मृतदेह सापडला. रात्री उशिरापर्यंत मंजाबापू यांचा शोध घेतला जात होता.
कोपरगावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजेवाडी येथील मंडपीनाल्यात बुडणाऱ्य़ा सचिन मोरे याला वाचविण्यासाठी त्याचे वडील संजय मोरे, ओम मोरे व शुभम पवार या तिघांनी पाण्यात उडय़ा घेतल्या. मात्र, संजय व सचिन या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओम व शुभम हे दोघे वाचले आहेत. तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांनी बाप-लेकाचे मृतदेह बाहेर काढले आहेत.