धक्कादायक:रोहित पवारांच्या मतदारसंघात तहसीलदारांच्या गाडीवर वाळूतस्कराने घातला डंपर, पुढे काय घडलं ? वाचा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात वाळू तस्करांचा धुडगूस सुरू आहे. मुजोर वाळूतस्करांने कर्जत तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या गाडीवर डंपर घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेने कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे सह आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

कर्जत तालुक्यातील कापरेवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान दाखवून वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा २२ किमी पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले.

शुक्रवार, दि १० रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कापरेवाडी शिवारात अवैध आणि विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार आगळे यांनी तात्काळ पथक तयार करीत कापरेवाडी गाठले. यावेळी पथकास (एमएच१७ बीवाय ७६७३) क्रमांकाचा डंपर येताना दिसला.पथकाने त्याची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. वाहनचालकाकडे परवाना असल्याची माहिती घेत असताना त्याने विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगितले.

पथकाने डंपर कोणाच्या मालकीचा आहे अशी विचारणा केली असता, चालकाने विनोद उर्फ आबा कदम (माहीजळगाव) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर तहसीलदार आगळे यांनी सदरचा डंपर तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. डंपर कर्जतच्या दिशेने घेत असताना चालकाच्या भ्रमणध्वनीवर वाहनमालक कदम याचा फोन आला असता, त्याने चालकास डंपर कर्जतला घेवून जाण्यास मज्जाव केला.

Shocking, Sand smuggler dumper hits tehsildar's vehicle in Rohit Pawar's constituency

चालकाने तात्काळ डंपर भरारी पथक असलेल्या वाहनाच्या (एमएच १६ बीझेड ७१७२) विरुद्ध दिशेने घेत तहसीलदार असलेल्या वाहनाच्या अंगावर घालत कापरेवाडीहुन शिंदेवाडीमार्गे टाकळी खंडेश्वरीकडे वळवला. यावेळी शिंदेवाडी लगत असलेल्या सोलर प्लांटच्या जवळ रस्त्यावरच वाळूने भरलेला डंपर खाली करीत भरधाव वेगात टाकळीकडे गेला. यावेळी रस्त्याची लांबी मोठी असल्याने तहसीलदार आगळे यांनी आपल्या चारचाकी गाडीने तब्बल २२ किमी डंपरचा पाठलाग करीत वाहनचालक आणि क्लिनर यास ताब्यात घेतले.

३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

तलाठी गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनमालक विनोद उर्फ आबा दादा कदम (रा. माहीजळगाव), वाहनचालक लक्ष्मण भुजंग काळे (रा. वालवड) , क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक (रा  सितपुर) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम १८६० नुसार ३०७, ३५३, ३७९, ४२७, ५०४, ३३ यासह खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम १९५७ चे कलम २२ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम४८(७)(८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईच्या पथकात यांचा होता समावेश

सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे, अव्वल कारकून संजय दुधभाते, अशोक नरोड यांच्यासह तलाठी धुलाजी केसकर, अविनाश रोडगे, गणेश सोनवणे, दीपक बिरुटे, पोलीस कर्मचारी देविदास पळसे, नितीन नरुटे यांनी पार पाडली.

मुजोर वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याची मागणी

कर्जत तालुक्यात भीमा आणि सीना नदीतून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते. महसूल आणि पोलीस पथक कारवाई करीत असताना मुजोर असलेले वाळूतस्कर त्यांना अडथळा आणून चक्क जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे. यांना वेळीच अटकाव आणणे महत्वाचे असून अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याचे नवल वाटणार नाही. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत यांचा बिमोड करणे आवश्यक आहे.

“साहेब अगोदर घरचे भेदी सरळ करा”

वाळू तस्कराना अभय असल्याशिवाय ते पथकावर जीव घेण्यासारखे प्रकार करणार नाहीत.कायदाचा दंडुका हाती घेत महसूल आणि पोलीस प्रशासनाने काम केल्यास मुजोर वाळू तस्कर सरळ होतील मात्र प्रशासनात घरचे भेदी असल्याने त्याचे फावते. प्रांतसाहेब आणि पोलीस उपअधीक्षक साहेब आपण एकदा आपले कर्मचाऱ्यांची उठबैस लक्षात घ्या आणि प्रथम त्यांना सरळ करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.