जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक चळवळीचा अभ्यासू आणि लढवय्या नेता अशी ओळख असलेले दत्तात्रय कृष्णाजी राळेभात गुरुजी अर्थात सर्वांचे लाडके शिक्षक नेते द.कृ. राळेभात यांचे आज दुख:द निधन झाले.या घटनेने राळेभात कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दत्तात्रय राळेभात गुरुजी हे गेली अनेक वर्षे प्राथमिक शिक्षक चळवळीत कार्यरत होते. शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक वर्षे लढा दिला. अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यातील शिक्षकांचे ते आधारवड होते. अतिशय हजरजबाबी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते राजकीय व सामाजिक चळवळीत लोकप्रिय होते.
प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून दत्तात्रय राळेभात गुरुजी यांनी 1998 -99 मध्ये काम पाहिले होते.या काळात त्यांनी सर्वाधिक लाभांश दिला होता. याच कारणामुळे ते लोकप्रिय शिक्षक नेते ठरले होते. 1994 ते 199 या काळात शिक्षक बँकेचे संचालक होते. काही वर्षे ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष होते. केंद्र प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर लढणारे सक्षम नेतृत्व म्हणून त्याची अहमदनगर जिल्ह्यात ओळख होती.
जेष्ठ शिक्षक नेते दत्तात्रय राळेभात अर्थात सर्वांचे लाडके द. कृ. राळेभात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दु:खद निधनामुळे सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. प्राथमिक शिक्षक चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना सर्वच जण व्यक्त करत आहेत.
शिक्षक नेते दत्तात्रय राळेभात हे पीएसआय विवेक राळेभात यांचे वडील होते. तसेच जामखेड बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर यांचे व्याही होते. राळेभात यांच्यावर उद्या 24 रोजी सकाळी साडेसात वाजता जामखेड येथील भूतवडा रोडवरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.