सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे औचित्य साधून एकल महिलांना मिळणार मदतीचा हात, जामखेड पंचायत समितीच्या पुढाकारातून विशेष सभेचे आयोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी एकल/विधवा भगिनींना आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले. सावित्रीबाईंचा हाच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जामखेड पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील सर्व गावांमधील एकल महिलांची (विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता ) विशेष सभा पार पडणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.

On the occasion of Savitribai Phule's birthday single women will get  helping hand, special meeting is organized on the initiative of Jamkhed Panchayat Samiti,

‘अमृत पंधरवडा’ या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने एकल महिलांची नोंदणी केली आहे. काही महिलांची नोंदणी राहिली असेल तर ३ जानेवारी पूर्वी नोंदणी करण्यात येणार आहे.एकल व निराधार महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम करण्याचा उद्देश यामागे आहे. सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेऊन एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समिती जामखेडच्या वतीने कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. सर्व एकल महिलांनी तात्काळ ग्रामसेवकांकडे आपली नोंदणी करून घ्यावी, असे अवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

३ जानेवारी रोजी होणाऱ्या गावनिहाय बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगण्यात येईल.एकल महिलांना कोणकोणत्या शासकीय योजना मिळतात ? याचा आढावा सदर बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीला गावातील महिला कार्यकर्त्या, बचतगट महिला मंडळ अध्यक्ष. शिक्षिका,सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

एकल महिलांच्या विशेष सभेत या गोष्टींवर चर्चा होणार

  1. संजय गांधी निराधार योजना
  2. या महिलांच्या १८ वर्षाखालील मुलांसाठी बालसंगोपन योजना
  3. बचत गट सहभाग
  4. रेशनकार्ड आहे का ?
  5. बँकेत जनधन खाते
  6. रोजगारासाठी या महिला काय करू इच्छितात
  7. शेतीत काय मदत (सिंचन विहीर/फळबाग/गायगोठा/शेळीपालन शेड) हवी आहे ?
  8. वारस नोंदी केल्या आहेत का ? मालमत्ता विषयक अडचणी काय आहेत ?
  9. पुढे शिक्षण पूर्ण करावेसे वाटते का ? त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व मुक्त शाळा उपक्रमाची माहिती देणे