Mob lynching incident in Maharashtra | पोलिस अधिकाऱ्यासह 04 जण ठरले माॅब लिंचिंगचे शिकार
30 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : चोर समजुन पोलिस अधिकाऱ्यासह चौघांना अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातून रविवारी उघडकीस आली आहे. (Mob lynching incident in Maharashtra) पिसाळलेल्या टोळक्याला वेळीच आवरल्याने पालघरची पुनरावृत्ती टळली. ही घटना अरणगावमध्ये घडली आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला वंजारवाडीतील 30पेक्षा अधिक जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला विशाल कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, मी व माझ्या कुटूंबातील सदस्य असे चौघेजण गावरान कोंबड्यांची खरेदी करण्यासाठी दि ०६ ऑगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील अरणगाव – पाटोदा परिसरातील गावांमध्ये गेलो होतो. या भागातून गावरान कोंबड्यांची विचारपूस करून कोंबड्या न मिळाल्याने आम्ही आमच्या एम एच ०६ ए एफ ५५०३ या इंडीगो कारने आष्टी तालुक्यातील खडकत गावाकडे जात असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आमची इंडिगो गाडी अरणगाव बसस्थानक परिसरात बळजबरीने आडवली. (Mob lynching incident in Maharashtra)
त्यानंतर दोघांनी आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पाठीमागून एक पिकअप गाडी व काही मोटारसायकली आल्या.पाहता पाहता ७० ते ८० लोक जमा झाले. त्यातील काही लोकांनी आमच्या गाडीवर रस्त्यावरील मोठमोठे दगड मारून गाडीच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडून आम्हा चौघांना बाहेर काढले. लोखंडी रॉड, बांबू दगडाने व काठ्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. जमावातील काही लोकांनी आमच्या जबरदस्तीने झडत्या घेतल्या. कोंबड्या खरेदी करण्यासाठी आणलेले माझ्या खिश्यातील ५० हजार रूपये हिसकावून घेतले व बेदम मारहाण केली व मारहाण करताना संतप्त जमावाने व्हिडीओ रेकॉर्ड केली आहे. त्यातून आमची बदनामी झाली असेही म्हटले आहे. ही घटना ०६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. (Mob lynching incident in Maharashtra)
पोलिस अधिकाऱ्यासह चौघे ठरले माॅब लिंचिंगचे शिकार
जामखेड तालुक्यातील अरणगावमधून माॅबलिंचिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आष्टीतील कोंबडी व्यावसायिक विशाल भानुदास कांबळे व त्यांचे भाऊ किरण भानुदास कांबळे (सहायक पोलीस निरीक्षक), सासरे संजय विठ्ठल निकाळजे, व सुनिल कचरू निकाळजे अश्या चौघांना संतप्त जमावाकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. (Four, including a police officer, became victims of mob lynching)
यांच्याविरोधात दाखल झाले गुन्हे
माॅबलिंचिंग प्रकरणी वंजारवाडी येथील बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉ सुरज रामकिसन जायभाय, राजु तुकाराम जायभाय, तुकाराम जायभाय, रामकिसन संभा जायभाय, मधुकर दत्तु जायभाय, शिवाजी जायभाय, बबन भगवान खाडे, सतिश ( पुर्ण नाव माहित नाही.) या नऊ जणांसह अन्य वीस ते 25 अश्या तीस पेक्षा अधिक लोकांविरोधात कलम ३०७, ३४१, ३२९, ३२४ सह आदी विविध कलमान्वये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Mob lynching incident in Maharashtra)
अन चौघांचे वाचले प्राण
अरणगावमध्ये वंजारवाडीतील टोळके नवख्या माणसांना मारत असताना अरणगावमधील नागरिक बघ्याची भूमिका घेत होते. त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर निरापराधांना अमानुष मारहाण झाली नसती. पण दुर्दैवाने आष्टीतील चौघेजण मारहाणीचे शिकार ठरले. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती समजताच अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे,पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फार पठाण, प्रविण निगुडे, रणजित कारंडे, प्रशांत जगताप यांनी सतर्कता दाखवली व संतप्त जमावाच्या तावडीतून चौघांची सुटका केली व एका ठिकाणी त्यांना सुरक्षित बसवले. सविस्तर चौकशी केली. फोनाफोनी केली. खात्री पटल्यानंतर चौघांना सुखरूप रवाना केले. सजग नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चौघांचे प्राण तर वाचलेच शिवाय अरणगावमध्ये पालघरची होणारी पुनरावृत्ती मात्र टळली. (Mob lynching incident in Maharashtra)