अहमदनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस विजांच्‍या कडकडाटासह वादळी पाऊस, हवामान विभागाने जारी केला धोक्याचा इशारा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । केरळमध्ये मान्सून (monsoon in kerala) दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात मान्सून (maharashtra monsoon) कधी दाखल होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. अश्यातच अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मान्सून पुर्व (pre-monsoon rain) वादळी पावसाचा इशार जारी केला आहे.

Meteorological department warns danger, stormy rain with lightning for next four days in Ahmednagar district, ahmednagar rain forecast

अहमदनगर जिल्ह्यात 8 ते 12 जुन 2023 या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा हा पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरीकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी आवाहन केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.

गडगडाटीच्‍या वादळा दरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब,धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-या, लोंबणा-या केबल्‍स पासून दूर रहावे.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे.जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. वादळी वा-यामुळे घर, पत्र्याचे शेड व शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.