Karjat Nagar Panchayat election | राम शिंदे आणि प्रविण घुले यांच्या वाढत्या भेटीवर रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। सध्या कर्जत नगरपंचायत (Karjat Nagar Panchayat election) निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छूक उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना दिसत आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा माजी मंत्री राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार असा थेट सामना कर्जत नगरपंचायत निवडणुकीत पहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. मतदारसंघात पक्षांतरे घडली. प्रत्यक्ष निवडणूक मैदानात पवार सरशी करणार का ? की शिंदे धोबीपछाड देणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

जामखेड दौर्‍यात आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूकीविषयी जामखेड टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कर्जत नगरपंचायत आमच्याच ताब्यात येणार असा दावा केला आहे. तसेच प्रविण घुलेविषयी मोठे भाष्य केले आहे. पाहूयात पवार काय म्हणाले.

प्रश्न : कर्जत नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार की राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार ?

उ) : रोहित पवार – कर्जत नगरपंचायत निवडणुक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. आमची काँग्रेस बरोबर चर्चा सुरू आहे. शिवसेने बरोबर चर्चा चालू आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तयार आहेत. ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न करू. मला विश्वास आहे हा प्रयत्न न राहता ते अस्तित्वात येईल. आणि निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.लोकांना कर्जतमध्ये विकास हवा आहे. जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

प्रश्न : नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून ही निवडणूक होणार आहे का ?

उ) रोहित पवार – असे होणार नाही, आधी सदस्यांचा फार्म भरला जाईल. ते आधी निवडून येतील. आम्ही सर्व जण त्यांना ताकद देऊ. जो कोणी नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष असेल तो नंतर ठरवला जाईल. पण ठरवत असताना एखादी चांगली व्यक्ती नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष व्हावा असं लोकांचं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे पदाधिकारी मनापासून लढाई करतील आणि आपल्या विचारांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणतील.

प्रश्न : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाताना सर्व पक्षीय समिती बनवून त्या निवडणुकीचं प्लॅनिंग आखले जाणार आहे का ?

उ) रोहित पवार – नक्कीच त्या पध्दतीने इलेक्शन लढलं जातं आणि अश्याच प्रकारे आम्ही काम करणार आहोत.प्रत्येक वार्डाला ग्रामीण भागातले एक निरिक्षक आहेत.ते सुध्दा त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकारीसुध्दा या इलेक्शनमध्ये मनापासून सहभागी झालेले आहेत.

प्रश्न : शिवसेना नाराज आहे अशी चर्चा आहे

उ) रोहित पवार : होय अशी चर्चा आहे. परवाच्या एका कार्यक्रमामध्ये त्याठिकाणी मी एक बातमी वाचली होती. ते माझ्यावर नाराज होते का पक्षावर नाराज होते हे मला सांगता येणार नाही. पण त्या पध्दतीची नाराजी आमच्यापर्यंत आलेली नव्हती पण आम्ही एकत्रित बसून जर कुठली नाराजी असेल, तर ती नक्की दुर करण्याचा प्रयत्न करू.

प्रश्न :  प्रविण घुले आणि राम शिंदे यांच्या भेटी सध्या वाढल्या आहेत. त्यांचे फोटो सोशल मिडीयावर जोरदार शेअर होत आहेत. या संपुर्ण बाबीकडे तुम्ही कसं पाहता ?

उ) रोहित पवार : तुम्हाला दोन दिवसांतच त्या बाबतीतल्या गोष्टी कळतील. त्या कळल्यानंतर तुम्हाला सगळं स्पष्टीकरण त्या ठिकाणी मिळेल. ते झाल्यानंतर जे काही स्पष्टीकरण असेल कर्जतची जनता ते स्पष्टीकरण स्विकारेल आणि चांगल्या विचारांचा पॅनल तो म्हणजे राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचा पॅनल निवडून देतील आणि 17 च्या 17 उमेदवार हे निवडून आलेले येत्या 22 तारखेला आपण सर्व बघू हा विश्वास आहे.

आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीकडून कर्जत नगरपंचायतची निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. तिन्ही पक्ष जागावाटपात कसा तोडगा काढतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. जागावाटप व उमेदवार या दोन्ही गोष्टी कसोटीच्या असणार आहेत. यात योग्य मार्ग काढून बंडाळी होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे.

पहा संपुर्ण मुलाखत