Karjat Nagar Panchayat elections | कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुस्लिमांना ठेंगा, समाजात मोठी नाराजी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या (Karjat Nagar Panchayat elections) प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे. ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी राज्यात गाजत आहे. भाजप व राष्ट्रवादीने या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतू उमेदवारी देताना राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाला ठेंगा दाखवला आहे. हाही मुद्दा आता कर्जतच्या राजकीय मैदानात तापू लागला आहे.

कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा संघर्ष उफाळून आलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याचा प्रत्यय कर्जतकरांना आला. रोहित पवार गटाकडून भाजपच्या काही उमेदवारांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला असा आरोप करत माजी मंत्री राम शिंदे यांनी मौनव्रत ठिय्या अंदोलन केले. हे अंदोलन राज्यात गाजले. त्यामुळे पवार विरूध्द शिंदे हा संघर्ष प्रचाराच्या रणधुमाळीत अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा मुस्लिम समाजावर अन्याय

सध्या सुरू असलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वता:ला पुरोगामी समजणार्‍या पक्षांनी मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न देणं हे होय. राष्ट्रवादीकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. उमेदवारीसाठी काही जण इच्छूक होते. आमदार रोहित पवारांनी उमेदवारी देताना मुस्लिम समाजाला ठेंगा दाखवला. यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासुन मुस्लिम समाज पुन्हा एकदा वंचित राहिला.एकप्रकारे राष्ट्रवादीने मुस्लिम समाजावर अन्याय केल्याची भावना समाजात आहे.

भाजपने दिला एक उमेदवार

कर्जत नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकमेव मुस्लिम उमेदवार रिंगणात आहे. भाजपने हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपने मुस्लिम समाजातील उमेदवाराला निवडणुकीत उतरवले आहे.

भाजपची भीती अन मुस्लिम वोटबँक

ऐरवी पुरोगामी पक्षांकडून मुस्लिमांना भाजपची भीती दाखवली जाते. त्यातून मग मुस्लिम समाजाची मते फुकटात आपल्याकडे वळवण्यात हे पुरोगामी पक्ष यशस्वी होतात. मुस्लिम समाजाचा सातत्याने वोटबँक म्हणून वापर केला जातो.प्रत्येक निवडणूकीत मुस्लिम समाज काँग्रेस राष्ट्रवादी आणि तत्सम भाजप विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी पडतो. त्यातूनच तो भाजप विरोधात एकगठ्ठा मते टाकत आलेला आहे. मात्र यंदा कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपने मुस्लिम समाजातून उमेदवारी देत वोटबँकेच्या राजकारणाला तडा देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

तथाकथित मुस्लिम पुढाऱ्यांनो समाजाची खदखद ओळखा

कर्जत शहरात मुस्लिम समाजाची 3 हजाराच्या आसपास मतदारसंख्या आहे. काही प्रभागात मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक आहे. यामुळे मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक होते. परंतू काही राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मुस्लिम समाजाला ठेंगा दाखवला. यातून मुस्लिम समाजाचे ‘अस्तित्वच’ नाकारण्याचा प्रयोग झाला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरवेळी होणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला गृहित धरले जाते. यंदाही असेच घडले. मुस्लिम समाजाचे नेते व कार्यकर्ते ज्या राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यांनी आता स्वता:चे फायदे बाजुला ठेऊन समाजाचे राजकीय उपद्रव्य मुल्य दाखवून देणे आवश्यक आहे. उमेदवारी न मिळाल्याची समाजात मोठी खदखद आहे. ही खदखद मुस्लिम नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळीच ओळखणे आवश्यक आहे. अन्यथा समाजाच्या रोषाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते असेच आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

वोटबँकेच्या राजकारणाला तडाखा बसणार ?

मुस्लिमांचा वापर फक्त वोटबँक म्हणून जे कोणी राजकीय पक्ष करू पाहत आहेत त्यांचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठी मुस्लिम समाज हादरा देणार का ? की पुन्हा एकदा त्या समाजाला भुलथापा देऊन गंडवले जाणार ? कर्जत नगरपंचायत निवडणुकीत वोटबँकेच्या राजकारणाला तडाखे बसणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खालील उमेदवार निवडणूक रिंगणात

उमेदवाराचे नावपक्षप्रभाग
खरात लंकाबाई देविदास राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक २
गायकवाड अश्विनी सोमनाथभाजपाप्रभाग क्रमांक ४
सोनमाळी मनीषा सचिन राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक ४
क्षीरसागर आशाबाई बाळासाहेब रा स पप्रभाग क्रमांक ४
तोटे मोनाली ओंकार राष्ट्रीय काँग्रेसप्रभाग ६
क्षीरसागर गणेश नवनाथभाजपा)प्रभाग ६
थोरात दिनेश बाळूशिवसेनाप्रभाग ६
लाढाणे बबनराव सदाशिव भाजपाप्रभाग क्रमांक ८
भाऊसाहेब सुधाकर राष्ट्रीय काँग्रेसप्रभाग क्रमांक ८
जपे उमेश शंकर भाजपाप्रभाग क्रमांक ९
सोमनाथ हरी वंचितप्रभाग क्रमांक ९
काळदाते अमृत श्रीधर राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक ९
गदादे मोनिका अनिल भाजपाप्रभाग क्रमांक १०
राऊत उषा अक्षय राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक १०
पिसाळ मोहिनी दत्तात्रेय भाजपाप्रभाग क्रमांक ११
नेटके ऐश्वर्या विजय राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक ११
मेहेत्रे शरद रामभाऊ भाजपाप्रभाग क्रमांक १२
राऊत नामदेव चंद्रकांत राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक १२
सुपेकर सुवर्णा रवींद्र राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक १३
शिंदे वनिता परशुराम भाजपाप्रभाग क्रमांक १३
सय्यद शिबा तारीख भाजपा प्रभाग क्रमांक १४
कुलथे ताराबाई सुरेश राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १४
भैलुमे संजय शाहूराव भाजपाप्रभाग क्रमांक १५
भैलुमे अनिल विश्वनाथ वंचितप्रभाग क्रमांक १५
भैलूमे संतोष आप्पा (अपक्ष प्रभाग क्रमांक १५
भैलुमे भास्कर बाबासाहेब राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक १५
काकडे सुवर्णा विशाल भाजपा प्रभाग क्रमांक १६
भैलुमे निर्मला दीपक वंचित प्रभाग क्रमांक १६
भैलूमे प्रतिभा नंदकिशोर राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १६
गदादे अनिल मारुती भाजपाप्रभाग क्रमांक १७
आगम धनंजय दादासाहेब अपक्षप्रभाग क्रमांक १७
 शेलार छाया सुनिल राष्ट्रवादीप्रभाग क्रमांक १७

बातमीसाठी संपर्क : सत्तार शेख, 9960105007