जामखेड : मीच उमेदवार समजून पांडुरंग उबाळेंना विजयी करा – आमदार प्रा राम शिंदे यांचे अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्हा मजुर फेडरेशनच्या निवडणुकीत जामखेड तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून पांडुरंग उबाळे यांना बोरूडे आण्णांनी तिकीट जाहीर केलयं, मजुर फेडरेशनमध्ये कामांचा पाठपुरावा करायला गेल्याच्यानंतर आपल्या मताचा, आपल्या विचाराचा माणूस तिथं असला, तिथं फेडरेशनमध्ये आपली सत्ता असली तर कामं झटपट होतात. त्यामुळे मीच उमेदवार समजून आपण सगळ्यांनी एक शिक्का मत देऊन सहकार पॅनलला निवडून द्यावं, असे अवाहन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.

Jamkhed, win Pandurang Ubale as my candidate, appeal of MLA Prof. Ram Shinde

अहमदनगर जिल्हा मजुर सहकारी संस्थांच्या (जिल्हा मजुर फेडरेशन) ची निवडणुक रंगात आली आहे. अर्जूनराव बोरूडे आण्णा यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे उमेदवार पांडुरंग उबाळे यांच्या प्रचारार्थ जामखेड शहराजवळील लेहनेवाडी येथे नुकतीच सभा पार पडली. यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होते, यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार पांडुरंग उबाळे, राजु फकिर,बन्सी कराळे, झुंबर पवार, लहू पवार, दिलीप सुरवसे, रमेश जाधव, सुरेश जाधव, मनोज कुलकर्णी, विलास कवादे, अजहर काझी, संदिप गिते,  शिवराम पवार, गणेश शेलार, कैलास माने, भरत राळेभात, मुकिंदा जाधव, विनायक राऊत, युवराज भापकर, विश्वास देशमाने, देविचंद डोंगरे, भरत उगले, सोमनाथ राळेभात, संतोष उगले, धनराज राजगुरु, गौतम उत्तेकर, भगवान ढास, विकास ढवळे, अर्जुनराव फडके, सह आदी चेअरमन यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की,गेल्या अडीच तीन वर्षांचा काळ मजुर सोसायट्यांसाठी अडचणीचा काळ गेला. माझ्या मंत्रिपदाच्या काळात कोणताही मजुर सोसायटीचा चेअरमन काम मागायला आला किंवा कोणाला मुद्दामहून काम दिलं नाही असा आपल्या समोर एक प्रसंग आला नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाची मोठ्या प्रमाणावर कामं होती, 3 लाखांच्या मर्यादेत अनेक सोसायट्यांच्या माध्यमांतून ती केली. सगळ्यांना काम देण्याचा आपण त्यावेळेस प्रयत्न केला. परंतू गेल्या अडीच तीन वर्षांत जामखेड तालुक्यातून मजुर सोसायट्यांच्या वाट्याला फक्त सात कामं आली.  पण या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी मजुर सोसायटीचे लोक अनेक वर्ष काम करत आहेत. अचानकपणे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने बोरूडे आण्णांनी जिल्हा मजुर फेडरेशन राज्यामध्ये अतिशय सदृढ आणि ताकदवान बनवला. त्यामुळे बोरूडे आण्णांच्या फेडरेशनच्या चळवळीला राज्यात वेगळे महत्व आहे.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, मजुर संस्थेचा चेअरमन म्हणून मी काही वर्षे काम केलं त्यामुळं अ वर्ग आणि ब वर्ग सोसायट्यांना कामं देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचं लक्ष वेधू, ते कामं त्या रकमेपर्यंत गेले पाहिजेत,कामं वाढले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नपूर्वक काम करू. मजुर सोसायटीच्या संदर्भात मी कधीही, केव्हाही हेवादेवा केला नाही. माझा तुझा केला नाही. त्यामुळे काम देण्याच्या संदर्भात जो प्रयत्न करेल, जो कामाचा पाठपुरावा करेल, त्या व्यक्तीला काम मिळालं पाहिजे, अन अधिकची कामं देण्यासाठी मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या दाराचा जरी असलो, तरी पुढच्या दारासारखं काम करून दाखवीन, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना दिला.

शिंदे पुढे म्हणाले की, मी आमदार सोडा, माजी मंत्री सोडा, पण मी तुमच्या बरोबर, कोणा बरोबर बी, एका बरोबर, सारखा नगरला, जामखेडला, टेंडर करायला, टेंडर भरायला, स्टॅम्प द्यायला, वर्क ऑर्डर घ्यायला सगळ्याबरोबर गेलेलो, आलेलो आहे, त्याच्यामुळे पांडुरंग उबाळेच्या मताचा विषयच नाही, मतं हे मला द्यायचेत, त्यामुळं सगळ्यांनी मतदान करायचं आहे, गेल्या वेळेस मनोज कुलकर्णी यांना बिनविरोध निवडून दिलं होतं, त्यावेळेस तुम्ही सर्वांनी माझं ऐकलं.

आता उमेदवार पांडुरंग उबाळे आहे, त्यामुळं त्यावेळेस बी मनोज कुलकर्णी या उमेदवाराचा विषय नव्हता, मी उमेदवार म्हणून तुम्ही बिनविरोध दिलं, अत्ता देखील मोठ्या संख्येने, एकत्रितपणे बोरूडे आण्णांकडे मागणी केली, विचार विनिमय केला आणि पांडुरंग उबाळे यांना बोरूडे आण्णांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मीच उमेदवार समजून आपण सगळ्यांनी एक शिक्का मत देऊन सहकार पॅनलला निवडून द्यावं, मजुर संस्थांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी तुमचा विधानभवनातला, विधीमंडळातला प्रतिनिधी म्हणून योग्य भूमिका पार पाडेन, त्यामुळं तुम्ही एक शिक्क्याने सहकार पॅनलला मतदान करावं, अशी विनंती यावेळी आमदार राम शिंदे यांनी केली.