Shivrajabhishek Sohala 2023 : हळगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात (Punyashlok Ahilya Devi Holkar Agricultural College Halgaon) युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajabhishek Sohala 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्था परिषदेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी हे होते. यावेळी चौधरी म्हणाले की, यशस्वी जीवन जगण्यासाठी आजही शिवरायांचे चरित्र प्रेरणादायक आहे. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने शिवचरित्राचे सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे. शिवरायांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे अवाहन त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, विद्यार्थी प्रतिनिधी अश्रफअली शेख आणि प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व त्यांच्या जीवनावरील लघुपट प्रक्षेपित करून करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे विद्यार्थी सुशांत बिराजदार व संस्कृती सनस यांनी भारूड सादर केले. स्नेहा कदम आणि वैष्णवी रानमाळे या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित पोवाडा सादर केला. महाविद्यालयाचे विद्यार्थी सतेज पाटील, रोशना दुरगुडे, सुमित ढोके, हर्षदा पाटील, कृष्णप्रिया कानवडे, प्रणिता खटपे, सुशांत बिराजदार यांनी छत्रपती शिवरायांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे डॉ.सखेचंद अनारसे यांनी शिवरायांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिवरायांचे गुण आपल्या आचरणात आणावेत असे आवाहन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रशेखर वाळे यांनी केले, तर संचिता नवले हिने आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.