जामखेड : खासदार सुजय विखे व आमदार रोहित पवार एकाच व्यासपीठावर, विखे – पवार युतीचे पुन्हा दर्शन, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात विखे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष जगजाहीर आहे, दोन्ही घराणे ऐकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, परंतू दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदारांनी अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः कर्जत-जामखेड मतदारसंघात उघड युतीचा झेंडा हाती घेतला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये छुपी युती आहे अशी चर्चा मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात होती. पण आता या छुप्या युतीचे उघड दर्शन सार्वजनिक कार्यक्रमात होत असल्याचे दिसत आहे. यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Jamkhed, MP Sujay Vikhe and MLA Rohit Pawar on the same platform, re-appearance of Vikhe-Pawar alliance, fueling various discussions in political circles

कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ. 25 वर्षे या मतदारसंघाने भाजपला विधानसभेत संधी दिली. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला.रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकाराने भाजपात दाखल झालेल्या विखे पिता पुत्रांनी विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदेंना खिंडीत पकडले. विखे समर्थकांनी उघडपणे पवारांच्या विजयासाठी मेहनत घेतली. विखेंनी विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना मदत केल्याची तक्रार भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांनी पक्षाकडे केली होती. विधानसभा निवडणुकीपासून तसेच त्यानंतर झालेल्या अनेक राजकीय उलथापालथीच्या घडामोडीत विखे – शिंदे हा वाद तापला आहे.

Jamkhed, MP Sujay Vikhe and MLA Rohit Pawar on the same platform, re-appearance of Vikhe-Pawar alliance, fueling various discussions in political circles

नुकत्याच पार पडलेल्या जामखेड बाजार समिती निवडणुकीत विखे – पवार यांच्यातील छुपी युती उघड झाली. विखे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पॅनलकडून उमेदवाऱ्या केल्या. ते निवडूनही आले. भाजपच्या पॅनलविरोधात विखे समर्थकांनी काम केल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. एकुण घडलेल्या घडामोडींवर आमदार प्रा.राम शिंदे यांनी बाजार समिती निवडणुकीनंतर माध्यमांसमोर येत विखेंच्या कारनाम्यांचा भांडाफोड केला.पक्षाकडेही तक्रार केली. विखे – शिंदे वादावर काय तोडगा निघणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील आठवड्यात अहमदनगरला आले होते, तेव्हा त्यांनी या वादावर भाष्य केले. वाद असला तरी वादळ नाही, त्यामुळे चिंता करू नका असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

Jamkhed, MP Sujay Vikhe and MLA Rohit Pawar on the same platform, re-appearance of Vikhe-Pawar alliance, fueling various discussions in political circles

दरम्यान, फडणवीस यांच्या दौऱ्याला आठवडा उलटत नाही तोच 2 जून रोजी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांनी जामखेडमधील जगदंबा लाॅन्स या ठिकाणी आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराला भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात रोहित पवारांनी भाषणही केली. या भाषणात रोहित पवारांनी खासदार डॉ.सुजय विखेंचे कौतुकही केले. एकुण घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता विखे – पवार यांच्यातील उघड युतीचे दर्शन आता राज्याला झाले आहे. भाजपा खासदार डॉ.सुजय विखे-पाटील हे भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांना अडचणीत आणणारी भूमिका घेत असल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार प्रा.राम शिंदे हे भाजपातील जुने निष्ठावंत नेते आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षात कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जंगी सभा पार पाडत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. पक्षात आयात केलेले विखे पिता पुत्र पक्षातील निष्ठावंत नेत्याला अडचणीत आणणार्‍या भूमिका घेत असल्याच्या घटनेची पक्षाने गंभीर दखल घेत कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची भावना मतदारसंघातील भाजपा आणि आमदार प्रा.राम शिंदे समर्थकांमधून जोर धरू लागली आहे.

जामखेड भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकडे जामखेड भाजपच्या पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. विखे यांच्याविषयी जामखेड भाजपमध्ये नाराजी असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.