जामखेड : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करुन घ्यावे – भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांचे आवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर खरिप हंगाम वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत शिंदे -फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचा मोठा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयानुसार उद्या 19 ऑक्टोबर 2022 पासून जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरु होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे कर्जत – जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे यांनी दिली.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाया जाण्याबरोबरच शेती वाहून गेली आहे. अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने हाती घेण्याचे आदेश संबधीत तहसिलदार यांना दिले आहेत, उद्या 19 ऑक्टोबर 2022 पासून जामखेड तालुक्यात पंचनामे सुरु होणार आहेत.
यावेळी बोलताना भाजपा नेते रविंद्र सुरवसे म्हणाले की, जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की आपण तलाठी ,कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे.पंचनामे करत असताना आपल्या मोबाईल वरून पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी तसेच जे शेतकरी आपल्या पिकाची नोंद मोबाईल वरून करणार नाहीत त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी असे सुरवसे म्हणाले.
जामखेड तालुक्यातील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित राहणार नाही. पंचनामे करताना काही अडचणी आल्यास आमच्याशी शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन भाजपचे कर्जत – जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.