जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “सन 2015-16 ला मीच कर्जतमध्ये एमआयडीसी (Karjat MIDC) व्हावी याबाबत पुढाकार घेतला होता.पाठपुरावा सुरु केला होता.आता या मुद्द्यावरून राजकारण ढवळून निघालं आहे.परंतू काळजी करायचं कारण नाही. कर्जत जामखेड मतदारसंघातील तरूणांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी कटीबध्द आहे. सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत एमआयडीसीचा प्रश्न मीच मार्गी लावणार, असा विश्वास आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी व्यक्त केला.”
“कर्जत एमआयडीसी मुद्द्यावरून आमदार प्रा.राम शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की सन 2015-16 ला मीच कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी याबाबत पुढाकार घेतला होता, आता त्याचा शेवट सुध्दा मीच करणार आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम बाळगायची गरज नाही, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.”
“यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, कर्जत एमआयडीसीच्या संदर्भामध्ये मी 2015-16 पासून प्रयत्न केले. त्याची जागा निश्चिती बद्दल सुद्धा जे मेमोरंटम किंवा प्रोसिजर उद्योग विभागाकडे आहे, ते उद्योग मंत्र्यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवलं.रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जी जागा प्रस्तावित केली आहे.त्या जागेवरती निरव मोदी (Nirav Modi) आणि त्यांच्या मित्रांची जागा आहे. ही जागा एमआयडीसीत भूसंपादित केली पाहिजे असा घाट आमदार रोहित पवारांनी घातलाय, म्हणूनच ते म्हणतात याच जागेवर एमआयडीसी व्हावी असा हट्ट ते धरत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.”
“उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की, जागा सलग पाहिजे, जागा खड्डे आणि उंचावरची नसली पाहिजे,तिथे पाण्याची व्यवस्था पाहिजे,तिथे विजेची व्यवस्था पाहिजे, तिथे रस्त्याची व्यवस्था पाहिजे,या सगळ्यांचा अभाव या जागेमध्ये दिसतोय. निरव मोदी, अग्रवाल, छेडा, शहा विनोद खन्ना अशा जमिनी तिथे आहेत. नकाशामध्ये कुठेही सुसूत्रता नाही. त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये किंवा जवळ ही जागा येते.अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक ऑगस्टला पाटेगावच्या गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेतली. एमआयडीसीला विरोध केला. ही बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, असे शिंदे म्हणाले.”
“आमदार राम शिंदे पुढे म्हणाले, पाच सहा महिन्यांपुर्वी रोहित पवारांनी हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखाना विकत घेतला. कारखाना विकत घेतल्याबरोबर त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढून टाकले. ते म्हणतात ना नवयुवकांना मी रोजगार देणार आहे, तरुणांच्या हाताला काम दिणार आहे, मग जे स्थानिक लोक कामा होते त्यांना का काढून टाकले ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.”
“रोहित पवार हे 2019 ला कर्जत-जामखेडचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले.कर्जत जामखेडच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला.पण त्यांचा कर्जत जामखेडकरांवर विश्वास नाहीये हे आता सिद्ध झालयं. कारण त्यांनी गेल्या चार वर्षात कर्जत जामखेडचा एकही पीए ठेवला नाही.त्यांचे कर्जत जामखेडमध्ये 50 ते 100 पीए आहेत,पण कर्जत जामखेडच्या एकाही तरुणांना त्यांनी पीए म्हणून ठेवलं नाही. एवढंच नाही तर 2019 साली माझा पीए फोडला. त्याची बातमी महाराष्ट्रात केली.त्या पीएसी सुद्धा काय हालत केलीत, त्याला सुद्धा कामावर ठेवलं नाही.म्हणजे तुमचे दाखवायचे दात वेगळेत, खायचे दात वेगळे, हे सगळं आता जनता ओळखून चुकलेली आहे, त्यामुळेच रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकु लागला आहे. त्यामुळेच ते बिथरले आहेत, असा जोरदार हल्ला आमदार प्रा राम शिंदे यांनी रोहित पवारांवर चढवला.”
तरुणांच्या हाताला काम देऊ हा नवीन मुद्दा त्यांनी काढला खरा परंतू हा मुद्दा सपशेल त्यांच्या अंगलट आल्याचं चित्र आपण गेल्या काही दिवसापासून पाहतोय. ते प्रसार माध्यमापुढे येऊन खोटी माहिती सांगत आहेत. त्यांना खरोखर मतदारसंघातील नवयुवकांच्या हिताचा विचार होता तर त्यांनी कारखान्यातील कामगार का काढले? स्थानिक एकही पीए नाही, मतदारसंघातील जनतेने यांच्यावर विश्वास ठेवायचा पण त्यांचा मात्र जनतेवर विश्वास नाही, त्यामुळे आता 2024 ला याच्याच उलट होईल. तुम्ही कितीही म्हटले तरी माझा कर्जत जामखेडवर विश्वास आहे. तरी कर्जत-जामखेडची जनता म्हणले तुम्ही स्थानिकचा एक पीए नाही ठेवला. रोहित पवारांचा कर्जत जामखेडच्या मुलांवर विश्वास नाही हेच यातून स्पष्ट होत असल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली.
“शिंदे म्हणाले की, भूलभूलैय्या करून ते निवडून आले. परंतू ते आता अडचणीत आलेत. जास्त काळ लोकांना फसवता येत नाही. लोकांनी ओळखून चुकलयं. त्यांना लोकं सोडून चाललेत. मतदारसंघातील जनता आता त्यांच्या भूलथापांना फसणार नाही. कर्जत एमआयडीसी मुद्द्यावर कुठे पाहिजे तिथे चर्चा करायची माझी तयारी आहे. टिव्हीवर डिबेट लावा मी तिथे यायला तयार आहे. तुम्ही आदानीची गाडी चालवता, लय उद्योग धंदे घेऊन चाललेत. मग जामखेडला का नाही गाडी वळवली ? तुम्ही तर सगळ्या दुनियेत प्रसिध्दी मिळवली अदानी सुध्दा माझे एकतात. मग तुमची गाडी जामखेडला का वळाली नाही, असा थेट सवाल आमदार शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.”
कर्जत एमआयडीसी झाली नाही हे त्यांचं सपशेल अपयश आहे. कर्जत तालुक्यातील तरुणांसाठी एमआयडीसी करण्याचं अश्वासन उद्योग मंत्र्यांनी दिलयं आणि मी ते करणार. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. हळगावला 65 कोटींचे शासकीय कृषि महाविद्यालय उभारताना राष्ट्रवादीच्या सरपंचाने माझ्याकडे 100 एकराचा ठराव आणून दिला. त्यानंतर कुसडगावला एसआरपीफ केंद्र उभारायचं होतं तिथंही राष्ट्रवादीच्याच सरपंचाने जागेचा ठराव आणून दिला. माझ्याच काळात त्याचं भूसंपादन झालं. त्यामुळे लोकांचा विश्वास असावा लागतो. तुम्ही एक काम हाती घेतलं तर ते तुम्ही निरव मोदीसारख्या दलालांनी कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनींचा मावेजा मिळवण्यासाठी करत आहात हे आता जनतेला कळून चुकलं आहे. असा घणाघाती हल्ला आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला.
“माझ्या बापाची जमिन सोडून कर्जत व जामखेडमध्ये माझ्या नावावर एक गुंठा जरी जमिन असेल तर ती सरकारकडे जमा करायला मी तयार आहे. पण तुम्ही आणि तुमच्या बगल बच्चांनी गेल्या अडीच तीन वर्षांत कर्जत-जामखेडमध्ये किती जमिनी घेतल्यात त्या तुम्ही सरकारला देणार का? आम्ही दीड हजार, दोन हजार स्क्वेअर फुट जागेत घर बांधलं तर 2019 ला तुम्ही केवढी चर्चा केली. आता त्यांनी दोन एकर जागेत अर्धा एकराचं घर बांधलयं, ते पण सांगितलं पाहिजे ना? केवढं घर बांधलयं, हे देखील बाहेर काढावं लागेल, असा गर्भित इशारा यावेळी आमदार राम शिंदे यांनी दिला.”