RDSS Scheme : आरडीएसएस योजनेंतर्गत 160 कोटी रूपयांचा निधी मंजुर,आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश,कर्जत-जामखेड मतदारसंघातील विजेची मोठी समस्या होणार दुर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत – जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed Constituency) विजेची समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आरडीएसएस (RDSS Scheme) योजनेंतर्गत महावितरणच्या (Mahavitran) कर्जत डिव्हिजनला (Karjat Division) 160 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.आरडीएसएस (Revamped Distribution Sector Scheme) योजनेंतर्गत मंजुर झालेल्या कामांमुळे कर्जत- जामखेड मतदारसंघातील विजेची मोठी समस्या दुर होणार आहे.याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. विजेची समस्या दुर करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Fund of Rs160 crores approved under RDSS scheme in Karjat Division, MLA Ram Shinde's pursuit got great success, Electricity problem in Karjat Jamkhed Constituency will be remote

खरिप आणि रब्बी हंगामात वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी असते. याकाळात डीप्यांवर अतिरिक्त ताण येतो, त्यामुळे शेतीपंप जळण्याच्या घटना सतत घडतात.यामुळे शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना नेहमी करावा लागत लागतो. शेतकऱ्यांची हीच अडचण दुर करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी महावितरणच्या कर्जत विभागाचा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावास ऊर्जा विभागाकडून आरडीएसएस योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सुमारे 159.51 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील विजेची मोठी समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. यामुळे खरिप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक विज मिळणार आहे.

राज्यात सत्ताबदल होताना प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार बनले. आमदार होताच प्रा राम शिंदे यांनी आपले होम ग्राउंड असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लक्ष केंद्रित केले.आमदार प्रा.राम शिंदे यांच्या जोरदार पाठपुराव्यातून गेल्या काही महिन्यांत करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात आला आहे,मतदारसंघातील विजेची समस्या दुर व्हावी याकरिता त्यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्यातून तब्बल 160 कोटी रूपयांचा निधी महावितरणच्या कर्जत डिव्हिजनसाठी मंजुर झाला आहे.या निधीतून मोठ्या प्रमाणात कामे होणार आहे. नवीन वीज उपकेंद्रांसह जुन्या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, तसेच विविध कामे मार्गी लागणार आहेत. यातून वीज वितरण सुरळीत व पुर्णदाबाने होण्यास मोठी मदत होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत महावितरणच्या कर्जत डिव्हिजनला मंजुर झालेल्या निधीतून फिडर सेपरेटेशनची कामे होणार आहेत.यामध्ये गावठाण आणि शेती फिडर एकत्र होते ते आता स्वतंत्र होणार आहे.शेतीचे फिडर स्वतंत्र होणार आहेत. तसेच 11 केव्हीची वाहिनी, त्याचबरोबर इतर अनेक कामे होणार आहेत.यासाठी 41.86 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

त्याचबरोबर वीज वितरण हानी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी 40.64 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तसेच सिस्टीम सुधारणेच्या प्रस्तावित कामांनाही मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ओव्हर लोड, व्होल्टेजचे प्रोब्लेम दुर करणे तसेच जामखेड तालुक्यातील चोंडी,कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे नवीन वीज उपकेंद्र तर कर्जत तालुक्यातील तसेच मिरजगाव,भांबोरा, कुळधरण आणि जामखेड तालुक्यातील खांडवी येथील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवण्याच्या कामांनाही मंजुर मिळाली आहे.यासाठी 77.01 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

आरडीएसएस योजनेंतर्गत एकुण 159.51 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ऊर्जा विभागाकडून कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीजेची मोठी समस्या होती.ऐन खरिप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागायचा, यातून शेती पिकांचे मोठे नुकसान व्हायचे. दुष्काळग्रस्त भागातील वीजेची समस्या दुर व्हावी यासाठी मतदारसंघातील महावितरणच्या विविध कामांचे प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे सादर करण्यात आले होते. या कामांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरडीएसएस योजनेंतर्गत मंजुरी दिली आहे. तब्बल 160 कोटी रूपये खर्चून ही कामे होणार आहेत. या कामांमुळे मतदारसंघातील वीजेची समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. मुबलक वीज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे माझे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व केंद्र व राज्य सरकारचे मनापासुन आभार..!

आमदार प्रा.राम शिंदे माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य