सोलापुरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा – कार्यकर्त्यांची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे अंदोलन तापलेले असतानाच आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळण्याची घटना सोलापुरमधून समोर आली. या घटनेत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत.धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा,अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

File a case against those who beat Dhangar Samaj activists in Solapur - activists demand, dhangar reservation latest news,

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यांने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. तद्नंतर भंडारा उधळला. मात्र या प्रकारानंतर विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. पोलिसांसमक्ष झालेल्या या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून, संबंधितांवर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी-मेष महामंडळची प्रस्तावित जागा ढवळपुरी, ता.पारनेर येथून बदलून अन्यत्र नेण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत. याबाबत समाजात तीव्र असंतोष असून, समाजाचे नेते आ.प्रा.राम शिंदे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांनी विधान सभेच्या अधिवेशनात मंजूर केलेला विषय कोणाच्या सांगण्यावरुन बदलला जात आहे, याचाही खुलासा होण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख काका शेळके,  वधू वर मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष निशांत दातीर, राष्ट्रीय जनमंचचे प्रदेश महासचिव भगवान जऱ्हाड, जेष्ठ नेते अशोक होंनमने, केदार हजारे, संग्राम शेळके, अथव गंगावणे, वैभव घायतडक, अशव औटी, कृषा तेपले, राहुल देठे सह आदींच्या सह्या आहेत.