कर्जत- जामखेड मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न रोहित पवारांच्या दरबारात : आठवडे बाजार असलेल्या गावांमध्ये महिला स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत आणि जामखेड तालुक्यातील आठवडे बाजारासाठी येणाऱ्या महिला शेतकऱ्यांची स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे  कुचंबणा होते. मतदारसंघातील महिलांच्या सन्मानासाठी आठवडे बाजारच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत अशी मागणी ॲड. विकास शिंदे व उषा घनवट यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील महत्वाच्या आणि मोठ्या गावांमध्ये आठवडे बाजार भरतात. या गावांच्या आसपासच्या साधारण १० ते १२ गावचे लोक सदर आठवडे बाजारासाठी त्या त्या गावात जात असतात. आपल्याकडे शेतातील भाजीपाला बाजारात नेऊन विकण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून घरातील महिलांची असते. त्यामुळे त्यांना दर आठवड्याला सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाजारात थांबावे लागते. तसेच बाजार खरेदीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला बाजारात येत असतात.

आठवडे बाजार असलेल्या परिसरात स्वच्छतागृह तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी असणे ही मुलभूत गरज आहे. विशेष करुन महिलांचा विचार करता आठवडे बाजारात महिलांसाठी स्वच्छतागृहांची कोणतीही सोय नसणे ही खुप गंभीर आणि सर्वांसाठीच लाजीरवाणी बाब आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाजारात असणारी महिला लघुशंकेला जावू शकत नसेल आणि जरी जायची वेळ आलीच तर उघड्यावर लघुशंका करावी लागत असेल तर हा महिलांच्या सन्मानासह आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब आहे.

बाजारात असलेल्या महिलांना ‘लघुशंका’ आल्यास ती त्यांना थांबवून ठेवावी लागते. त्याचा घातक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. यामुळे त्यांच्या किडनीवर ताण पडतो. मूत्राशयाच्या पिशवीमध्येही विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. घराबाहेर पडताना ‘अडचण’ नको म्हणून महिला पाणीच पित नाहीत. त्याचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

सदर आठवडे बाजारचा दरवर्षी ग्रामपंचायत मार्फत लिलाव केला जातो. आणि त्या लिलावातून साधारण दोन ते अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळत असते. त्यामुळे आठवडे बाजारात येणारे विक्रेते व ग्राहक यांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र आजपर्यंत याबाबत कोणतीही उपाययोजना ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली नाही. आज पर्यंत जे झाले ते झाले मात्र इथून पुढे याबाबत तातडीने योग्य उपाययोजना संपूर्ण कर्जत-जामखेड मतदार संघात राबविण्याची गरज आहे.

संपुर्ण मतदारसंघातील आठवडे बाजार असलेल्या गावांमध्ये पक्के स्वच्छतागृह गृहे उभारण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, परंतू सदर गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच भविष्यात पक्के स्वच्छतागृह उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे मागणी आ. रोहित पवार व सुनंदाताई पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.