Big Breaking | धक्कादायक : जामखेड तालुक्यात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने उडाली मोठी खळबळ,मोहरी गावातील घटना,परिसरात भीतीचे वातावरण !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | Big Breaking | नरभक्षक बिबट्याच्या दहशतीच्या आठवणी ताज्या असतानाच जामखेड तालुक्यात अधून मधून बिबट्याचे दर्शन होत असल्याचे दिसून येत आहे.अश्यातच बिबट्या संबंधी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Leopard cubs found dead in Jamkhed taluka, incident in Mohri village)

जामखेड तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगेतील मोहरी (Mohari) परिसरात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ऐन सुगीच्या दिवसात बिबट्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

जामखेड तालुक्यातील मोहरी येथील खंडोबा विहीर बामण दळा परिसरातील भगवान महादेव हाके (Bhagwan Mahadev Hake) यांच्या शेतात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे.(Big Breaking, Leopard cubs found dead in Jamkhed taluka, incident in Mohri village)

मोहरी येथील शेतकरी भगवान महादेव हाके हे आपल्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती बबन गोपाळघरे, पांडू बांगर, अशोक गोपाळघरे ,त्रिंबक गोपाळघरे, सागर हाके, ईश्वर हातमोडे ,संजय हजारे यांना फोनवरून कळवली. घटनास्थळी सर्व शेतकरी धावून आले.

जामखेड तालुक्यातील मोहरी येथील मृतावस्थेत आढळून आलेले बिबट्याचे पिल्लू

त्यानंतर बबन गोपाळघरे यांनी संबंधीत घटनेची माहिती जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे यांना कळवली. त्यानंतर तहसीलदार यांनी वन विभागाला घटनेची माहिती देऊन घटनास्थळी पाठवले.

घटनेची माहिती मिळताच जामखेड वनविभागाचे वनपाल प्रवीण उबाळे, वनरक्षक किसन पवार, रामनाथ देवकर, किशोर गांगर्डे ,शहाजी नेहरकर, राघू सुरवसे, शिवाजी चिलगर सह आदींच्या पथकाने मोहरीला भेट दिली व मृतावस्थेत आढळून आलेले बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेतले. (Big Breaking, Leopard cubs found dead in Jamkhed taluka, incident in Mohri village)

…. तरच मृत्यूचे कारण समोर येईल

मृत बिबट्याच्या पिल्लाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ? याबाबत उत्तरीय तपासणीनंतरच सर्व काही स्पष्ट होईल. परंतू बालाघाटात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे. यामुळे या भागात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

मागील वर्षी नायगाव भागात बिबट्याचे हल्ले

मागील वर्षी बिबट्याने नायगाव परिसरात पाळीव जनावरांवर तसेच वानरांचा प्राणघातक हल्ले करण्याच्या घटना घडल्या होत्या. यात पाळीव प्राणी व वानरे मृत्यूमुखी पडले होते. या घटना ताज्या असतानाच खर्डा किल्ला भागात बिबट्याचे दर्शन झाले होते.

नरभक्षक बिबट्याच्या आठवणी अजूनही ताज्या

नरभक्षक बिबट्याने जामखेड शेजारी आष्टी, कर्जत व करमाळा या तालुक्यात मागील वर्षी मोठा धुडगूस घातला होता. या बिबट्याने अनेकांचे बळी घेतले होते. अहमदनगर, बीड व सोलापूर या तीन जिल्ह्यात या नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत होती. अखेर या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सरकारला काढावे लागले, त्यानुसार उजनी धरणाच्या बॅक वाॅटर परिसरातील गावात बिबट्याला ठार करण्यात आले होते.

जामखेड तालुक्यातील मोहरी येथील मृतावस्थेत आढळून आलेले बिबट्याचे पिल्लू

कर्जत तालुक्यातही बिबट्या सक्रीय

नरभक्षक बिबट्याचे प्रकरण शांत होत नाही तोच कर्जत तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी बिबट्याने एका शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला करत गंभीर जखमी केले होते. मागील महिन्यात कोरेगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे.

जामखेड- कर्जत – आष्टी भागात नेमके किती बिबटे?

गेल्या काही महिन्यांपासून जामखेड, कर्जत, आष्टी या तीन तालुक्यात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. या भागात बिबटे आलेच कसे ? हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. या भागात नेमके किती बिबटे आहेत ? त्यांची संख्या किती ? यावर वनविभागाकडून कुठलीच ठोस माहिती दिली जात नाही. दरम्यान बालाघाट डोंगर रांगेच्या भागात बिबट्यांचे वास्तव्य सातत्याने अधोरेखित होत आहे. भविष्यात बिबट्यांची संख्या वाढल्यास हा भाग बिबट्यामय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खर्डा भागात भीतीचे वातावरण

खर्डा परिसरातील मोहरी भागात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने या भागात आणखी बिबटे असण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.