लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कर्जत तालुक्यात धडक कारवाई, वीस हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारास पकडले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडण्याची धडाकेबाज कारवाई लाचलुचपत विभागाने आज कर्जत तालुक्यात केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Anti Corruption Bureau nabbed police constable while accepting a bribe of Rs 20,000 in Karjat taluka)

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील एका 37 वर्षीय ग्रामस्थाविरूद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय 52) या पोलीस हवालदाराने त्याच्याकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार याने अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीवरून 06 जुन 2022 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडुुन लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यात आरोपी लोकसेवक अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय ५२) याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोड अंती 20 हजार  स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यावरुन आज 7 जुन रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कर्जत तालुक्यातील राशिन येथे आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय 52) याने लाचेची रक्कम (20 हजार रुपये) पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडुन भिगवण रोडवरील खरात हॉस्पिटलसमोर स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी लोकसेवक विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी लोकसेवक हा कर्जत तालुक्यातील राशिन दुरक्षेत्र येथे कार्यरत होता.

अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडाकेबाज कारवाई केल. ला.प्र. वि.अहमदनगरचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. कारवाईच्या पथकात पोलिस हवालदार संतोष शिंदे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पोलिस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार  हरुन शेख, राहुल डोळसे सह आदींचा समावेश होता.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते कि. त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर दुरध्वनी 0241- 2423677 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.